निलंबित पोलीस निरीक्षक विकास देयकरसह महिलेला अटक

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषणप्रकरण : पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
04th November, 11:31 pm
निलंबित पोलीस निरीक्षक विकास देयकरसह महिलेला अटक

पणजी :
रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपप्रकरणी जुने गोवा पोलिसांनी निलंबित पोलीस निरीक्षक विकास देयकर आणि अन्य एका महिलेला बुधवारी (४ रोजी) अटक केली. तपासादरम्यान दोन्ही संशयितांच्या जबाबांत तफावत आणि विसंगती आढळून आली. तसेच, प्रकरणातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यांवर समाधानकारक उत्तरे देण्यात दोघेही अपयशी ठरल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. अटक केलेल्या दोघांना गुरुवारी (५ रोजी) मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.
मुरगाव तालुक्यातील पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, निलंबित पोलीस निरीक्षक विकास देयकर याने २५ जुलै आणि २७ ऑक्टोबर रोजी तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या तक्रारीच्या आधारे जुने गोवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक अंजली धुळपकर यांनी देयकर आणि संबंधित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) यातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.
पीडितेवर गोमेकॉत उपचार सुरू
गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित मुलीला मेरशी येथील ‘अपना घर’मध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती बिघडल्याने तिला पुढील उपचारांसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस खात्याने निरीक्षक विकास देयकर याला निलंबित केले आहे.
तीन टप्प्यांत चौकशी
या प्रकरणाचा तपास करताना जुने गोवा पोलिसांनी ३१ ऑक्टोबर रोजी संशयित विकास देयकर आणि संबंधित महिलेची प्राथमिक चौकशी केली होती. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी दोघांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले. यावेळी सलग दोन तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी, ४ नोव्हेंबर रोजी दोघांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले.
संशयितांच्या जबाबांत विसंगती
या चौकशीदरम्यान दोन्ही संशयितांच्या जबाबांत महत्त्वाच्या मुद्द्यांवर तफावत आणि विसंगती आढळून आली. प्रकरणातील अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील बाबींवर समाधानकारक उत्तरे देण्यात दोघेही अपयशी ठरल्याचे तपास यंत्रणेच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्या जबाबांची आणि तपासादरम्यान उपलब्ध झालेल्या पुराव्यांची पडताळणी करण्यात आली.
साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता
तपासादरम्यान पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांत संशयितांचा प्रथमदर्शनी सहभाग दिसून आल्याचे समोर आले आहे. संशयितांना अटक न करता बाहेर ठेवल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात किंवा प्रकरणाशी संबंधित पुराव्यांमध्ये छेडछाड करू शकतात, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. तपासाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची ठरल्याने जुने गोवा पोलिसांनी बुधवारी दोघांना अटक केली.
आज न्यायालयात हजर करणार
अटक केलेले निलंबित पोलीस निरीक्षक विकास देयकर आणि संबंधित महिलेला गुरुवारी मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या दोघांची पोलीस कोठडी मिळवून प्रकरणाचा पुढील तपास करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. चौकशीदरम्यान समोर आलेल्या विसंगती, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत अधिक तपास केला जाणार आहे.