अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का

डेमोक्रॅट्सचे सिनेटमध्ये बहुमत : रिपब्लिकन पक्षाचा पराभव; महागाई, इराण युद्धाचा मतदारांवर प्रभाव

Story: गोवन वार्ता। न्यूज डेस्क |
04th November, 11:28 pm
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का

वॉशिंग्टन : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेटमध्ये ५० जागांचा टप्पा ओलांडत बहुमत मिळवले आहे. टेक्सास, साउथ कॅरोलिना, ओहायो आणि कॅन्सस यांसारख्या रिपब्लिकन पक्षाच्या बालेकिल्ल्यांमध्येही डेमोक्रॅट्सनी विजय मिळवला. या निकालानंतर ट्रम्प यांनी डेमोक्रॅट्ससोबत मिळून काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
२०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांना मोठे मताधिक्य मिळालेल्या भागांमध्येही डेमोक्रॅट्सनी आघाडी घेतली. त्यामुळे ट्रम्प यांच्या समर्थकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांवर डेमोक्रॅट्सचे नियंत्रण वाढण्याची शक्यता असून, हा निकाल ट्रम्प यांच्या कार्यकाळातील मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
निवडणुकीत महागाई, वाढता घरखर्च, ट्रम्प प्रशासनाचे आयात शुल्कविषयक धोरण आणि इराणसोबतचे युद्ध हे प्रमुख मुद्दे ठरले. २०२४ मध्ये महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या ट्रम्प यांना वाढत्या किमतींमुळे मतदारांच्या नाराजीला सामोरे जावे लागले.
एसएसआरएसच्या मतदानोत्तर सर्वेक्षणानुसार, दहापैकी सुमारे नऊ मतदारांनी दैनंदिन वस्तूंच्या वाढत्या किमती आणि घरखर्च हे मतदानासाठी महत्त्वाचे मुद्दे असल्याचे सांगितले. सुमारे दोनतृतीयांश मतदारांनी महागाईसाठी ट्रम्प यांना जबाबदार धरले. तर दहापैकी जवळपास सहा मतदारांनी त्यांच्या धोरणांमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था आणखी खालावल्याचे मत व्यक्त केले.
ट्रम्प यांच्या कामगिरीवर मतदार नाराज
सीएनएनच्या सर्वेक्षणानुसार, दहापैकी सहापेक्षा अधिक मतदार ट्रम्प यांच्या कामगिरीवर नाराज होते. असोसिएटेड प्रेसच्या सर्वेक्षणातही सुमारे सहा मतदारांनी ट्रम्प देशाच्या हितापेक्षा स्वतःच्या वैयक्तिक फायद्याला प्राधान्य देत असल्याचे मत मांडले. सरकारी भ्रष्टाचार, ट्रम्प यांचे वर्तन आणि इराण युद्धाबाबतही मतदारांमध्ये नाराजी दिसून आली.
रिपब्लिकनच्या बालेकिल्ल्यांत डेमोक्रॅट्सची मुसंडी
- टेक्सासमध्ये जेम्स टॅलारिको यांनी विजय मिळवत गेल्या ३८ वर्षांतील डेमोक्रॅटिक पक्षाचा पहिला सिनेट विजय नोंदवला.
- साउथ कॅरोलिनामध्ये एनी अँड्र्यूज यांनी ट्रम्प यांच्या पसंतीच्या उमेदवार डार्लिन ग्रॅहम यांचा पराभव केला. २०२४ मध्ये ट्रम्प यांनी या राज्यात १८ टक्के मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.
- ओहायोमध्ये शेरॉड ब्राउन यांनी रिपब्लिकन पक्षाकडील सिनेटची जागा पुन्हा जिंकली. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराने गव्हर्नरपदाची निवडणूकही जिंकली.
- कॅन्ससमध्ये अॅडम हॅमिल्टन यांनी विद्यमान रिपब्लिकन खासदार रॉजर मार्शल यांचा पराभव केला. त्यामुळे १९३२ नंतर प्रथमच या राज्यात डेमोक्रॅटिक पक्षाला सिनेट निवडणुकीत विजय मिळाला.
ऐतिहासिक विजयांची नोंद
या निवडणुकीत काही ऐतिहासिक निकालही लागले. जॉर्जियामध्ये कीशा लान्स बॉटम्स या अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला गव्हर्नर ठरल्या. न्यू मेक्सिकोमध्ये डेब हॅलंड यांनी विजय मिळवत पहिल्या मूळ अमेरिकी महिला गव्हर्नर होण्याचा मान मिळवला. तर न्यू हॅम्पशायरचे ख्रिस पॅपस हे सिनेटवर निवडून आलेले अमेरिकेतील पहिले समलैंगिक पुरुष ठरले.
डेमोक्रॅट्ससमोरही आव्हाने कायम
डेमोक्रॅटिक पक्षाला मोठे यश मिळाले असले, तरी धोरणांची अंमलबजावणी करताना अडचणी येऊ शकतात. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे असलेला व्हेटोचा अधिकार आणि सिनेटमध्ये बहुतांश विधेयके मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेली ६० मतांची अट यामुळे डेमोक्रॅट्सना आपला संपूर्ण राजकीय कार्यक्रम राबवणे कठीण ठरण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या इराणविषयक धोरणात बदल होईल, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. पक्षीय बदलांमुळे अमेरिकेचे इराणविरोधी धोरण बदलणार नाही. अमेरिकेला सवलती दिल्याने तिचे शत्रुत्व कमी होणार नाही. इराणवरील नव्या अमेरिकी हल्ल्याला अधिक व्यापक प्रत्युत्तर दिले जाईल.
- मोजतबा खामनेई, सर्वोच्च नेते, इराण