पणजी : रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या (Crime Branch Goa) कार्यालयात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षक विकास देयकर आणि दुसऱ्या संशयित महिलेला बुधवारी जुने गोवा पोलिसांकडून अटक करण्यात आली. (Old Goa Police have arrested suspended Crime Branch Police Inspector Vikas Deykar and one Woman) पोलीस कोठडीसाठी उद्या गुरुवारी त्यांना प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मुरगाव तालुक्यातील पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, जुने गोवा पोलिसांनी शुक्रवार, ३० रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. निरीक्षक विकास देयकर याने २५ जुलै आणि २७ ऑक्टोबर रोजी लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
जुने गोवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक अंजली धुळपकर यांनी संशयित देयकर आणि संबंधित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, दोन दिवस चौकशी केल्यानंतर अखेर बुधवारी पोलिसांनी निरीक्षक देयकर आणि दुसऱ्या संशयित महिलेला अटक केली.


