श्री बोडगेश्वर देवस्थान निवडणूक उच्च न्यायालयाकडून रद्द

तीन महिन्यांत पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश; म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर देवस्थानची निवडणूक गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
श्री बोडगेश्वर देवस्थान निवडणूक उच्च न्यायालयाकडून रद्द

म्हापसा : येथील श्री देव बोडगेश्वर देवस्थानची निवडणूक गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने  ( High Court of Bombay at Goa.)  रद्द केली आहे.  तीन महिन्यांत देवस्थानची पुन्हा निवडणूक घेण्याची व तोपर्यंत प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

या निवडणूक प्रक्र‌ियेला आनंद भाईडकर आणि संतोष वागर यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. सुनावणीत दोन्ही बाजू ऐकून  घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने वरील आदेश दिला.

श्री देव बोडगेश्वर देवस्थानच्या (Shri Dev Bodgeshwar Sansthan Temple Mapusa) कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीसंदर्भात माजी अध्यक्ष आनंद भाईडकर आणि महाजन संतोष वागर यांची याचिका यापूर्वी प्रशासकीय लवादाच्या अध्यक्ष द्विजपल पाटकर यांनी फेटाळून लावली होती. या याचिकेवरील निवाडा ६० दिवसांत द्यावा.

तसेच निवाड्याचा अंतरिम अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने २१ मार्च रोजी गोवा प्रशासकीय लवादाला दिले होते. त्यानुसार ३० मे रोजी लवादाने वरील दोन्ही याचिका रद्दबातल ठरवल्या होत्या. त्यानंतर आनंद भाईडकर व संतोष वागर यांनी या निर्णयाला वरील न्यायालयात आव्हान दिले होते.

 गेल्या दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री देव बोडगेश्वर देवस्थानची निवडणूक झाली होती. या निवडणुकीच्या ऐन वेळी म्हणजेच शुक्रवार दि.७ रोजी सायंकाळी देवालय प्रशासकांनी देवस्थानच्या सचिवांनी सादर केलेली नव्या २५४ महाजनांसह एकूण २१०४ जणांची यादी मतदानासाठी ग्राह्य धरली. आणि त्यांना मतदानात सहभाग घेण्यास मोकळीक देणारा आदेश जारी केला होता. त्यानंतर याच यादीनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत याचिकादार आनंद भाईडकर हे पराभूत झाले होते. 

या निवडणूक प्रक्रियेविरूध्द देवस्थानतर्फे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी उच्च न्यायालय तसेच प्रशासकीय लवादाकडे याचिका दाखल केली होती. यामध्ये नवनिर्वाचित समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. वामन पंडित, उपाध्यक्ष अमेय कोरगावकर, सचिव हरिश्चंद्र उर्फ सुशांत गावकर, सहसचिव कुणाल धारगळकर, खजिनदार श्यामसुंदर पेडणेकर, उपखजिनदार विशांत केणी, मुखत्यार राजेंद्र पेडणेकर व उपमुखत्यार साईनाथ राऊळ तसेच बार्देशातील देवालयांच्या प्रशासकांना प्रतिवादी बनविले होते.

हेही वाचा
सर्व पहा