गोव्यात ४२६ अनधिकृत भंगार अड्डे, स्थलांतराचे धोरण कागदावरच

दक्षिण गोव्यात २३४ अड्डे : आगीच्या घटनांचे सत्र सुरूच

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd November, 09:59 pm

संपूर्ण राज्यात एकूण ४२६ अनधिकृत भंगार अड्डे असून, या अड्ड्यांचे नियमन करून ते खास व्यापार क्षेत्रांमध्ये स्थलांतरित करण्याचे प्रस्तावित धोरण अद्याप अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. उत्तर गोव्यात १९२, तर दक्षिण गोव्यात २३४ अड्डे आहेत. स्थलांतरास होत असलेल्या विलंबामुळे भंगार अड्ड्यांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

४२६
राज्यातील एकूण भंगार अड्डे
१९२
उत्तर गोवा
२३४
दक्षिण गोवा
७
यंदा नोंद झालेल्या आगीच्या घटना

मंगळवारी, २ नोव्हेंबर रोजी कुंडई येथील साबा स्क्रॅप ट्रेडर्स या अड्ड्याला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या तैनात कराव्या लागल्या. यासाठी सुमारे १.७ लाख लिटर पाणी आणि ७०० लिटर फोमचा वापर करण्यात आला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

२०२५ मध्ये संपूर्ण राज्यात २२ भंगार अड्ड्यांना आग लागली होती. या घटनांनंतर केलेल्या तपासणीत एकाही अड्ड्याकडे वैध अग्निसुरक्षा ना हरकत दाखला नसल्याचे अहवालात नमूद आहे. यंदा दिकरपाळ येथील अड्डा दाखल्याविना सुरू असल्याचे, तर ढवळी येथील अड्डा बंद करण्याचा आदेश पंचायतीने देऊनही तो सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे.

बार्देश तालुक्यात सर्वाधिक भंगार अड्डे

उत्तर गोव्यात बार्देश तालुक्यात सर्वाधिक ६६ भंगार अड्डे आहेत. याखालोखाल तिसवाडीत ५७, डिचोलीत ४९, तर पेडणे आणि सत्तरीमध्ये प्रत्येकी १० अड्डे आहेत. दक्षिण गोव्याचा विचार केल्यास सासष्टीत सर्वाधिक १०८ अड्डे आहेत. तसेच फोंड्यात ५५, मुरगावमध्ये ५०, काणकोणमध्ये ११ आणि केपे तालुक्यात १० अड्डे कार्यरत आहेत.

तालुकाभंगार अड्डे
बार्देश६६
तिसवाडी५७
डिचोली४९
पेडणे१०
सत्तरी१०
सासष्टी१०८
फोंडा५५
मुरगाव५०
काणकोण११
केपे१०
व्यापार क्षेत्रासाठी जागेचा शोध

भंगार अड्डे, पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करणाऱ्या घटकांना भाडेतत्त्वावर जागा देण्यासाठी व्यापार क्षेत्रे विकसित करण्याच्या उद्देशाने गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ सरकारी जमीन शोधण्याचे काम करत आहे. सुरुवातीला ही जबाबदारी गोवा औद्योगिक विकास महामंडळावर सोपवण्यात आली होती. परंतु, औद्योगिक वसाहतींमध्ये भंगार अड्ड्यांना परवानगी नसल्याचे त्यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये स्पष्ट केले होते.

आस्नोडा येथे जागा निश्चित

मार्च २०२४ मधील बैठकीनुसार, सरकारी जमीन शोधणे, तिचे संपादन करणे आणि व्यापार क्षेत्रांच्या विकासासाठी ती औद्योगिक महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचे काम कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे सोपवण्यात आले. यासाठी एप्रिल २०२४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीने बार्देश तालुक्यातील आस्नोडा परिसरात ४५,४०० चौरस मीटर सरकारी जागा शोधून काढली आहे.

नियमांत बदलाची प्रतीक्षा
  1. भंगार अड्ड्यांना जागा देण्यासाठी औद्योगिक महामंडळाच्या नियमांमधील अपात्र घटकांचा उल्लेख वगळून त्यात बदल करण्याचा सल्ला अॅडव्होकेट जनरल यांनी दिला होता.
  2. मुख्यमंत्री आणि कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या अध्यक्षांनी ६ मार्च २०२५ रोजी या प्रस्तावाला मान्यता दिली. मात्र, नियमांत अद्याप प्रत्यक्ष बदल न झाल्याने स्थलांतराचा प्रश्न सुटलेला नाही.
यंदा सात आगीच्या घटना

गोव्यात भंगार अड्ड्यांना आग लागण्याचे सत्र सुरूच असून यंदा ३ नोव्हेंबरपर्यंत तब्बल सात वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे. यात नऊहून अधिक अड्ड्यांचे नुकसान झाले आहे.

ठिकाणआगीची तारीख
बेतोडा२१-२२ फेब्रुवारी
म्हापसा१७ मार्च
झुआरीनगर८ एप्रिल
दिकरपाळ२६ मे
ढवळी३१ मे
कोलवाळ२४ जून
कुंडई२ नोव्हेंबर

बेतोडा येथील आगीत तीन, तर इतर घटनांमध्ये प्रत्येकी एका अड्ड्याचे नुकसान झाले.

हेही वाचा
सर्व पहा