म्हादई प्रश्नी कर्नाटककडून दबावतंत्राचा अवलंब

कळसा भांडुराच्या मान्यतेसाठी हुबळी, धारवाडमधील शेतकरी रस्त्यावर; म्हादई नदीचे पाणी वळवून मलप्रभा नदीत सोडणाऱ्या कळसा भांडुरा प्रकल्पासाठी आता हुबळी, धारवाड परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यामुळे म्हादईचा प्रश्न आणखी चिघळणार आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
48 mins ago
म्हादई प्रश्नी कर्नाटककडून दबावतंत्राचा अवलंब

पणजी : म्हादई नदीचे पाणी वळवून मलप्रभा नदीत सोडणाऱ्या कळसा भांडुरा प्रकल्पासाठी आता हुबळी, धारवाड परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यामुळे म्हादईचा प्रश्न आणखी चिघळणार आहे. कळसा भांडुरा प्रकल्पांना केंद्र सरकारने लवकरात लवकर मान्यता द्यावी नपेक्षा रस्त्यावर ठाण मांडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी हुबळी - धारवाड नगरपालिकेला दिले आहे.

कळसा-भांडुरा प्रकल्पाव्दारे म्हादईचे पाणी वळविण्याची कर्नाटकची योजना आहे. यासाठी कर्नाटकने डीपीआर तयार करून तो केंद्राला पाठविला आहे. आवश्यक ते दाखले मिळाले नसल्याने पाणी वळविण्याच्या कर्नाटकच्या मनसुब्यांना अद्याप यश आलेले नाही. म्हादईचे पाणी वळविण्यास गोवा सरकारचा तीव्र विरोध असून हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतानाही प्रकल्प पुढे रेटण्याचे कर्नाटकचे प्रयत्न सुरूच आहेत. आता पुन्हा हुबळी-धारवाड येथे आंदोलन सुरू झाल्याने प्रकल्प पुढे रेटण्याचे कर्नाटकचे प्रयत्न आणखी तीव्र होतील.

कर्नाटकातील नवलगुंद आणि नरगुंद येथील शेकडो शेतकऱ्यांनी 'कळसा भांडुरा पाणी प्रकल्पांच्या अंमलबजावणीची मागणी पुन्हा लावून धरत रस्त्यावर उतरून निदर्शने केली. पाणी सुरक्षा आणि म्हादई नदीच्या परिसंस्थेवर होणाऱ्या परिणामांच्या चिंतेपोटी गोवा राज्य या प्रकल्पाला विरोध करत आहे.

आंदोलक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यासाठी हुबळी-धारवाड महानगरपालिकेची तातडीची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. तसेच, सरकारने यावर कोणतीही कार्यवाही न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा
सर्व पहा