कुडचडे : वास्को येथील ‘संडे बाजारा’ला (Sunday Market Vasco) लागलेल्या आग दुर्घटनेनंतर राज्यातील नगरपालिका क्षेत्रातील गजबजलेल्या बाजारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कुडचडे-काकोडा नगरपालिका क्षेत्रातील जीसुडा (GOA STATE URBAN DEVELOPMENT AGENCY (G S U D A) ) मार्केटसहीत बाजारातील कित्येक दुकानदारांकडे आग विझवण्यासाठी लागणारी प्राथमिक यंत्रणा उपलब्ध नसल्याचे पाहणीत दिसून आले.
पाहणीनंतर बाजारात आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागणारी यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक व अधिकारी यांनी दिली. कुडचडे बाजारातील जीसुडा मार्केटमधील ‘फायर हायड्रंट’ चालत नाहीत तर कित्येक दुकानदारांकडे आग लागल्यास विझवण्यासाठी लागणारे ‘फायर एक्स्टींग्वीशर’ नसल्याचे पाहणीत दिसून आले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगरसेवक, अभियंते, अग्निशमन दल इत्यादींनी कुडचडेतील बाजाराची पाहणी केली. त्यानंतर बाजारात आग लागल्यास विझवण्यासाठी लागणारी प्राथमिक यंत्रणाच कार्यान्वयीत नसल्याचे दिसून आले.
जीसुडा मार्केटमधील ‘फायर हायड्रंट’ बंद
आपत्कालीन स्थितीत आग विझवण्यासाठी लागणारे जीसुडाच्या मार्केटमधील चार ‘फायर हायड्रंट’ चालत नसल्याचे दिसून आल्याची माहिती स्थानिक नगरसेवकांनी दिली. या मार्केटमधील स्थिती धोकादायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाजारातील कित्येक दुकानदारांकडे आग लागल्यास विझवण्यासाठी ‘फायर एक्स्टींग्वीशर’ नसल्याचे या पाहणीत दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.
जीसुडाच्या मार्केटमध्ये अनेक दुकाने, गाडे असून, नेहमीच गर्दी असते. अशा परिस्थितीत आग लागल्यास वास्कोसारखीच मोठी दुर्घटना घडण्याची व त्यात मानवी हानी होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. पाहणीनंतर यापुढे कुडचडे बाजारात आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागणारी यंत्रणा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बंद असलेले ‘फायर हायड्रंट’ सुरू करणे, ८ ‘फायर हायड्रंट’ बसवणे तसेच दुकानदारांमध्ये जागृती करून आग विझवण्यासाठी लागणारे ‘फायर एक्स्टींग्वीशर’ घेण्यास प्रवृत्त केले जाणार आहे. यासंदर्भात कुडचडे अग्निशमन दल आवश्यक मार्गदर्शन करणार आहे. यापुढे आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. तुर्तास कुडचडे मार्केट ‘राम भरोसे’ असल्याची माहिती स्थानिक व्यावसायिकांनी दिली.


