माशेल : बेतकी-खांडोळा पंचायतीच्या राजकारणात सध्या अंतर्गत मतभेदांनी गंभीर वळण घेतल्याचे चित्र दिसत आहे. ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या पंचायतीच्या पाक्षिक बैठकीला सरपंच श्रध्दा फडते यांच्याव्यतिरिक्त आठही पंच सदस्यांनी दांडी मारल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. अणि पंचायतीत एक नवा विक्रम झाल्याची चर्चा रंगली आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील सर्वच सदस्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने सरपंच फडते एकाकी पडल्याचे दिसून आले आहे.
पंचायत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी पंचायतीची पाक्षिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सरपंच श्रध्दा फडते उपस्थित होत्या. मात्र, सत्ताधारी गटातील पंच सदस्यांसह विरोधी गटाच्या सर्व सदस्यांनी अनुपस्थित राहणे पसंत केले. सरपंच फडते यांनी स्वतः सत्ताधारी गटातील सदस्यांना फोन करून बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली होती. तरीही आठही सदस्य अनुपस्थित राहिल्याने आवश्यक कोरम अभावी बैठक रद्द करण्याची वेळ सरपंचांवर आली.
सरपंच श्रद्धा फडतेंचा कार्यकाळ संपला?
पूर्वी झालेल्या करारानुसार विद्यमान सरपंच श्रध्दा फडते यांचा कार्यकाळ संपल्यानंतर एका माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्याला सरपंचपदाची संधी मिळणे अपेक्षित असल्याची चर्चा आहे. मात्र, फडते अद्याप पदावर कायम असल्याने या मुद्द्यावरून पंच सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. त्यातच एका मोठ्या प्रकल्पाच्या भोगवटा प्रमाणपत्राचा प्रश्न आणि पंचायतीतील अन्य काही महत्त्वाच्या विषयांवरूनही अंतर्गत संघर्ष वाढल्याची कुजबुज आहे.
नव्या समिकरणांची चर्चा
पंचायत क्षेत्रात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. विरोधी गटातील सदस्य आणि सत्ताधारी गटातील नाराज पंच सदस्य एकत्र येऊन नेतृत्वबदलासाठी काही वेगळे राजकीय डावपेच आखत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
९ नोव्हेंबर रोजी बैठक
पंचायत सचिवांच्या माहितीनुसार, सरपंच श्रध्दा फडते यांनी पुढील पाक्षिक बैठक ९ नोव्हेंबर रोजी बोलावली आहे.


