कोरगाव : देऊळवाडा–कोरगाव येथे जुन्या पंचायत कार्यालयाजवळ (Deulwada- korgao old Panchayat office) रस्त्याच्या बाजूला जलवाहिनी फुटल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून रस्त्यावर पाणी साचत होते. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याचबरोबर सध्या पाण्याची टंचाई असताना हजारो लिटर पाणी वाया जात होते. सध्या जलवाहिनी दुरुस्त केली असली जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी खोदलेला खड्डा तसाच ठेवल्याने, वाहन चालकांना धोका निर्माण झाला आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेत जलवाहिनीची दुरुस्ती केली. मात्र, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर पडलेला खड्डा माती टाकून बुजवणे आणि रस्ता पूर्ववत करणे आवश्यक होते. परंतु, अद्याप या ठिकाणी खड्डा बुजवण्यात आलेला नाही.
या मार्गावर रात्रीच्या वेळी वेगाने वाहनांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत वाहनचालकाने वाहन बाजूला घेताना खड्ड्याचा अंदाज न आल्यास मोठा अपघात होऊन गंभीर दुखापत किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जलवाहिनीची दुरुस्ती केल्यानंतर खड्डा बुजवून रस्ता सुरक्षित करणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी असताना, अद्याप त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. यावरून संबंधित अधिकारी आपल्या कामाबाबत किती जागरूक आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
खड्डा बुजवून रस्ता दुरुस्त करावा
संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या ठिकाणी खड्डा बुजवून रस्ता पूर्ववत करावा आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.


