मडगाव : आगामी विधानसभा निवडणुकीत आपण बाणावलीतून तर वालंका (Valanka Alemao) नावेलीतून लढणार, असे माजी मंत्री चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांनी सांगितले. तसेच काँग्रेसने योग्य उमेदवारांना तिकीट द्यावीत, तिकीटांची विक्री केल्यास निवडणूक जिंकणे काँग्रेसला कठीण आहे, असे मतही चर्चिल यांनी व्यक्त केले.
वार्का येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत चर्चिल आलेमाव यांनी सांगितले की, आगामी निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होण्यासाठी व बहुमत प्राप्त होण्यासाठी योग्य उमेदवारांना तिकीटे देण्याची गरज आहे.
मात्र, पक्षश्रेष्ठींनी निष्ठावंत आणि जनतेमध्ये काम करणार्या कार्यकर्त्यांना डावलून पैशांच्या व्यवहारातून उमेदवारी दिल्यास पक्षाचे मोठे नुकसान होईल. काँग्रेसकडून तिकीटांची विक्री होत असल्याचे आपणास समजलेले आहे, असा आरोपही त्यांनी केला. मात्र, आपणाकडून पैसे मागण्यात आले का, अशी विचारणा केली असता, आपणाकडे पैसे मागितलेले नाहीत व पैसे देउन आपणास तिकीटही नको.
राजकारणात केवळ लोकांच्या सेवेसाठी आहोत, यावर आपला उदरनिर्वाह नाही, असे स्पष्ट केले. तिकीट पैशांच्या व्यवहारातून विकले जाऊ शकते, याची मला २०० टक्के खात्री आहे. असे झाल्यास गोव्यात काँग्रेस पक्ष संपेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
काँग्रेससोबत अजूनही चर्चा
आपण बाणावली मतदारसंघातून तर वालंका नावेलीतून निवडणूक लढणार. काँग्रेससोबत अजूनही चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढण्यास पहिली पसंती आहे. काँग्रेसने तिकीट नाकारल्यास लोकांच्या आग्रहास्तव आपण निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पैशांच्या बळावर किंवा ब्लॅकमेलिंग करून राजकारण करण्याची आपल्याला कधीही गरज भासली नसल्याचे नमूद केले. राजकारण हा लोकसेवेचा मार्ग असून, जनतेचा आपल्याला पाठिंबा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयएसएलमध्ये पंचाचे निर्णय निष्पक्ष असावेत
राज्यातील फुटबॉलच्या विकासाबाबतही चर्चिल आलेमाव यांनी भाष्य केले. इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) पंचांचे निर्णय निष्पक्ष आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे. पंचांच्या निर्णयांमध्ये पारदर्शकता राहिल्यास खेळाडूंना न्याय मिळेल आणि राज्यातील फुटबॉलच्या विकासालाही चालना मिळेल. तसेच चर्चिल ब्रदर्सची टीम आयएसएल जिंकू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्मोणा फुटबॉल मैदान आपल्या प्रयत्नातून : चर्चिल
कार्मोणा येथील फुटबॉल मैदान होण्यासाठी आमदार असताना आपण पाठपुरावा करत निधी मंजूर करून घेतला होता. आता मैदान पूर्ण झाल्यावर सध्याचे आमदार केवळ प्रसिध्दी घेत आहेत. त्यांनी केवळ हॉटेलकडे जात सीएसआर निधी मागून स्वार्थ साधायचे काम केलेले आहे. आपण मंजूर करून घेतलेल्या कामांचे आता आमदार व्हेंझी उद्घाटन करत आहेत. बाणावलीत कुणी विकासकामे केली हे आगामी निवडणुकीवेळी लोकच मताच्या माध्यमातून दाखवून देतील, असेही चर्चिल आलेमाव यांनी सांगितले.


