अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; बाल हक्क संरक्षण आयोगाची स्वेच्छा दखल

जुने गोवे क्राईम ब्रँचच्या पोलीस निरीक्षकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून गोवा बाल हक्क आयोगाने याची स्वेच्छा दखल घेत तीन दिवसांत चौकशी अहवाल मागवला आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
8 mins ago
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; बाल हक्क संरक्षण आयोगाची स्वेच्छा दखल

पणजी : जूने गोवे येथील क्राईम ब्रँचच्या कार्यालयात एका पोलीस निरीक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित लैंगिक शोषण प्रकरणाची गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. प्रसारमाध्यमांमधील वृत्तांच्या आधारे आयोगाने या प्रकरणी स्वेच्छा दखल घेत पोलीस उपमहानिरीक्षकांना चौकशीचा सविस्तर अहवाल येत्या तीन दिवसांत सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

 ३० ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे बाल हक्क आयोगाने ही कारवाई केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची आणि नागरिकांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडूनच अशा प्रकारचे कृत्य घडल्याचे आरोप झाल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष शशिकांत पुनाजी यांनी स्पष्ट केले की, बालकांचे हक्क आणि सुरक्षा जपण्यासाठी आयोग कटिबद्ध असून, या घटनेची निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.

या संपूर्ण प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीची ओळख आणि तिची गोपनीयता पूर्णपणे सुरक्षित ठेवली जाईल, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही आयोगाने दिल्या आहेत. तसेच या प्रकरणाच्या चौकशीच्या दृष्टीने तक्रारीची प्रत, एफआयआर आणि आतापर्यंतच्या तपासाचा प्राथमिक अहवाल पुढील तीन दिवसांच्या आत आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. 

 रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या पोलीस स्थानकात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी संशयित आरोपी पोलीस निरीक्षक विकास देयकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश पोलीस खात्याने शनिवारी सायंकाळी जारी केला असून, जुने गोवे पोलिसांनी संशयित देयकर यांची चौकशी सुरू केली आहे.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे जुने गोवे पोलिसांनी शुक्रवारी संशयित विकास देयकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ७५, १२७, ४९, ६१(२) व ३९५ आणि पोक्सो कायद्याच्या कलम १० व १२ अन्वये लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पीडितेची अपना घरमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा
सर्व पहा