शिरोडा मतदारसंघातून लढवणार निवडणूक : दीपक ढवळीकर

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
5 hours ago
शिरोडा मतदारसंघातून लढवणार निवडणूक : दीपक ढवळीकर

पणजी : कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार शिरोडा मतदारसंघावर दावा सांगतानाच, भाजपसोबत युती कायम ठेवण्यासाठी मगो पक्ष योग्य ती तडजोड करेल. मात्र, युती तुटल्यास आम्ही स्वतंत्र मार्ग स्वीकारण्यास तयार आहोत, असे मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी स्पष्ट केले.शनिवारी पणजी येथे मगो पक्षाची सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, मगोचे आमदार सुदिन ढवळीकर आणि जीत आरोलकर तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.

शिरोडा मतदारसंघावर दावा

शिरोडा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणे हे युतीवर अवलंबून असून, भाजपसोबतची युती तुटल्यास आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू. मगोने शिरोडा मतदारसंघ निवडणुकीसाठी निश्चित केला असून, आपण शिरोड्यात यावे अशी विनंती करणारी अनेक पत्रे कार्यकर्त्यांनी लिहिली आहेत, असे ढवळीकर बैठकीनंतर म्हणाले.

पाच जागा जिंकण्याचा विश्वास : ढवळीकर

गेली पाच वर्षे सोबत राहिल्यामुळे भाजपसोबत युती व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. शक्य तितकी तडजोड करून युतीत राहण्याचा प्रयत्न करू, मात्र तसे न झाल्यास वेगळे होण्याचा दुसरा पर्याय खुला आहे. मगोची १६ मतदारसंघांत तयारी सुरू असून, युती असो किंवा नसो मगो स्वबळावर पाच मतदारसंघ जिंकेल, असा विश्वास ढवळीकर यांनी व्यक्त केला.

संसदीय मंडळ घेणार निर्णय

जीत आरोलकर हे मगोचे आमदार असून, त्यांना उमेदवारी देण्याबाबतचा विचार संसदीय मंडळ निश्चितपणे करेल. मगोच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून संसदीय मंडळाची स्थापना केली जाईल आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर हे मंडळ दुसऱ्या दिवशी युतीसंदर्भात आपला निर्णय घेईल, असे ढवळीकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

पक्ष मजबूत आणि एकसंध

१९८० पासून आधी काँग्रेस आमचे आमदार घेऊन जात होती आणि आता भाजप घेऊन जाऊ लागली आहे. ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे, त्यांची ती इच्छा असली तरी, पक्षाचे आमदार गेले तरी पक्ष मजबूत आणि एकसंध आहे. जोपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदार आहेत, तोपर्यंत कोण आले आणि कोण गेले याचा फरक पडत नाही आणि आम्हाला सोडून गेलेले कोणीही पुढे जाऊ शकलेले नाहीत, असे सांगून, पक्ष टिकवण्यासाठी आवश्यक असलेले दोन-तीन आमदार किंवा ८ टक्के मते पक्षाला व्यवस्थित मिळतात, असा विश्वास ढवळीकर यांनी व्यक्त केला.

पाच ठराव मंजूर

या सर्वसाधारण बैठकीत पाच ठराव मंजूर करण्यात आले असून, केंद्रीय समितीचा कार्यकाळ तीन वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय समिती आणि कार्यकारी समितीला अधिकार प्रदान करण्यात आले असून, पक्षाच्या महिला विभागाचीही स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती ढवळीकर यांनी दिली.

हेही वाचा
सर्व पहा