म्हापसा :रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या पोलीस स्थानकात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी संशयित आरोपी पोलीस निरीक्षक विकास देयकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश पोलीस खात्याने शनिवारी सायंकाळी जारी केला असून, जुने गोवे पोलिसांनी संशयित देयकर यांची चौकशी सुरू केली आहे.
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे जुने गोवे पोलिसांनी शुक्रवारी संशयित विकास देयकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ७५, १२७, ४९, ६१(२) व ३९५ आणि पोक्सो कायद्याच्या कलम १० व १२ अन्वये लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या पोलीस स्थानकात २५ जुलै २०२६ आणि २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पीडितेसोबत हा लैंगिक शोषणाचा प्रकार घडला होता. या प्रकारानंतर पीडितेने २९ ऑक्टोबर रोजी या प्रकरणी अधिकृत तक्रार नोंदवली.
शुक्रवारी ३० ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंदवल्यानंतर जुने गोवे पोलिसांनी संशयित देयकर यांना नोटीस बजावून चौकशीसाठी पाचारण केले होते. त्यानुसार शनिवारी संशयित देयकर पोलीस स्थानकात हजर झाले असून, पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.
पोलीस खात्याने शनिवारी सायंकाळी संशयित आरोपी पोलीस निरीक्षक विकास देयकर यांना सेवेतून निलंबित करणारा आदेश जारी केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जुने गोवे पोलीस करत आहेत. दरम्यान, पीडितेची रवानगी ‘अपना घरात’ केली आहे.
तीन वर्षांपूर्वी संशयित आरोपी पोलीस निरीक्षक विकास देयकर हे सायबर गुन्हे शाखेत असताना पीडित मुलीची त्यांच्यासोबत ओळख झाली होती. त्यावेळी संशयिताने पीडितेची मदत केली होती. या ओळखीचा गैरफायदा घेऊन संशयिताने अनेकदा तिला गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावून घेतले आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.


