लहान मुलावर सोडला कुत्रा केपेतील घक्कादायक प्रकार, एकाला अटक

केपे येथील फुटबॉल मैदानावर खेळणाऱ्या अल्पवयीन मुलावर एकाने कुत्रा सोडला. या कुत्र्याने मुलांच्या पायांचा चावा घेतला तसेच संशयिताने लाकडी दांडक्याने मुलाला मारहाण केली. याप्रकरणी केपे पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयिताला अटक केली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
लहान मुलावर सोडला कुत्रा  केपेतील घक्कादायक प्रकार, एकाला अटक

पणजी : केपे येथील भाट फुटबॉल मैदानावर खेळत असलेल्या अल्पवयीन मुलावर कुत्रा सोडून त्याला व त्याच्या मित्रांना मारहाण केल्याप्रकरणी केपे पोलिसांनी कस्टोडियो डायस या संशयिताला अटक केली आहे. 

माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत एक अल्पवयीन मुलगा आपल्या मित्रांसह भाट येथील मैदानावर फुटबॉलचा सामना खेळत होता. यादरम्यान खेळताना मुलांच्या दोन गटांमध्ये काही कारणावरून वाद निर्माण झाला. दरम्यान तिथे आलेल्या कस्टोडियो डायस याने आपल्या ताब्यातील कुत्रा थेट एका मुलावर सोडला. त्या कुत्र्याने त्याच्या दोन्ही पायांचा चावा घेतला व अंगावर उडी घेत ओरबाडले. यात मुलाला दुखापत झाली. 

 पुन्हा मैदानावर आल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाला व त्याच्या बचावासाठी धावलेल्या इतर मित्रांनाही संशयिताने बेदम मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कुत्र्यासारख्या पाळीव प्राण्याबाबत कोणतीही खबरदारी न घेता सार्वजनिक ठिकाणी इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी नागरिकांमधून कारवाईची मागणी होत होती.

या प्रकरणी पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून केपे पोलिस स्थानकात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांसह गोवा बाल कायदा २००३ च्या कलम ८ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी कस्टोडियो डायस याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जोईसी काव्हालो करत आहेत.

सप्टेंबर २०२४ मध्ये गोव्यात पिटबुल कुत्र्याच्या हल्ल्यात एका लहान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर, पशुसंवर्धन खात्याने राज्यातील कुत्र्यांच्या मालकांसाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. या अधिसूचनेनुसार, यापुढे घरात पाळलेल्या कुत्र्यामुळे कोणत्याही मानवाला किंवा प्राण्याला इजा झाल्यास किंवा धोका निर्माण झाल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी मालकाचीच राहील. यासाठी मालकांना पशुसंवर्धन खात्याकडे लेखी प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

अधिसूचनेत नमूद केल्यानुसार, कुत्र्यामुळे कोणालाही हानी पोहोचल्यास किंवा मालकाने निष्काळजीपणा दाखवल्यास त्याच्यावर 'भारतीय न्याय संहिता २०२३' नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे पाळीव कुत्र्यांची योग्य ती काळजी न घेतल्यास मालकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक

पाळीव कुत्र्याने कोणावरही हल्ला केल्यास किंवा इजा पोहोचवल्यास, त्याचा संपूर्ण वैद्यकीय खर्च संबंधित मालकालाच करावा लागणार आहे. याशिवाय, मालकांना आपल्या कुत्र्याची संपूर्ण माहिती—जसे की नाव, जन्म तारीख, प्रजाती (ब्रीड), लिंग यांसह इतर तपशील पशुसंवर्धन खात्याला देणे बंधनकारक आहे. "कुत्र्यामुळे कोणालाही त्रास किंवा दुखापत झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील," असे स्पष्ट नमूद केलेले प्रतिज्ञापत्र मालकाला सादर करावे लागेल.

सार्वजनिक ठिकाणी खबरदारी आवश्यक

कुत्रा पाळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. कुत्र्याला सार्वजनिक ठिकाणी नेताना त्याच्या गळ्यात साखळी (पट्टा) असणे आणि त्याच्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच, पाळीव कुत्र्याला रेबीजची लागण झाल्याचे संशयित लक्षण आढळल्यास, मालकाने तत्काळ 'मिशन रेबीज'च्या हेल्पलाइनवर संपर्क साधून माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.



 

हेही वाचा
सर्व पहा