पणजी: सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांनी गोवा मुक्तीसाठी १९४६ पासूनच प्रयत्न सुरू केले होते. १९५० मध्ये त्यांनी परराष्ट्र खात्याला भारतीय लष्कर गोव्याला केवळ दोन तासात मुक्त करू शकते असे म्हटले होते. मात्र जवाहरलाल नेहरूंच्या अहिंसावादी परराष्ट्र धोरणामुळे गोव्याला मुक्ती मिळवण्यासाठी पुढील ११ वर्षे वाट पहावी लागली असे प्रतिपादन मुख्यमंत्र डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी केले.
शनिवारी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त पणजीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व अन्य अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, भारताला अखंड ठेवण्यामध्ये वल्लभभाई पटेलांची मोठी भूमिका आहे. भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळणार हे समजल्यावर त्यांनी देशातील विविध संस्थानिकांची बोलणी सुरू केली. सर्व संस्थांनाना भारतात समाविष्ट करून घेतले.
१९४६ मध्ये त्यांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहून गोवा भारतात समाविष्ट होणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. गोवा हा भारताचा अविभाज्य भाग असून गोव्याला पोर्तुगीज शासनापासून मुक्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले होते.
१९५० मध्ये झालेल्या एका कॅबिनेट बैठकीत देखील त्यांनी गोवा मुक्तीचा विषय मांडला होता. त्यावेळी देखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर १९५० मध्ये ते एकदा मुंबई ते चेन्नई असा बोटीने प्रवास करत होते. गोव्याच्या हद्दी जवळ आल्यावर त्यांनी बोट थांबवण्यास सांगितले.
बोटीच्या कप्तानाला ही बोट घेऊन आपण गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त करूया असे म्हटले. तेव्हा त्या कप्तानाने, जोपर्यंत आम्हाला पंतप्रधान लिहित स्वरूपात असा आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही असे स्पष्ट केले.
तेव्हा देखील जवाहरलाल नेहरू यांच्या अहिंसावादामुळे भारताने पोर्तुगीज शासित गोव्यावर हल्ला केल्यास बाकीचे देश काय म्हणतील याचाच विचार केला गेला. मात्र या धोरणामुळे गोव्यासह युवा मुक्ती साठी लढणाऱ्या देशातील स्वातंत्र्यसैनिकांना शहीद व्हावे लागेल.
डिसेंबर १९५० मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा मृत्यू झाला. त्यांना आणखीन काही वर्षे मिळाले असतील तर गोवा नक्कीच मुक्त झाला असता. त्यांचे म्हणणे ऐकले असते तर गोव्याला १९५० - ५२ पर्यंत मुक्ती मिळाली असती. आजच्या पिढीला देशाच्या स्वातंत्र्याचा, गोवा मुक्तीचा हा इतिहास माहिती असणे आवश्यक आहे.
देशाला एकत्र ठेवण्यासाठी वल्लभ भाई पटेल यांनी मोठे योगदान दिले. आज आपला धर्म, जात, भाषा, संस्कृती वेगळी असली तरी आपण सर्व भारतीय आहोत हे नेहमीचलक्षात ठेवले पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


