गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
वास्को नगरपालिका मार्केटमध्ये लागलेल्या अग्नितांडवाची चौकशी महसूल सचिवांमार्फत केली जाणार आहे. चौकशी अहवालासोबतच सुरक्षा उपायांच्या शिफारशी ७ दिवसांच्या आत सरकारला सादर करण्याचे आदेश गृह खात्याने दिले आहेत.
बुधवारी रात्री वास्को नगरपालिका मार्केटमध्ये लागलेल्या आगीत विक्रेत्यांचे सामान खाक झाले होते. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बाधित विक्रेते आणि दुकानदारांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, अग्निशामक दलाच्या गाड्या उशिरा पोहोचल्याचा आरोप केला जात आहे. अग्निशामक दल खरोखरच उशिरा पोहोचले का, याचीही चौकशी केली जाईल. विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी जागेचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. नुकसान झालेल्या विक्रेत्यांना लवकरात लवकर भरपाई देण्यासोबतच मार्केट इमारतीचे बांधकाम सुरू केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
या संपूर्ण घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश गृह खात्याने जारी केले आहेत. चौकशी प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर आधारित होणार आहे. आगीसारखी आपत्ती उद्भवल्यास सरकारी यंत्रणांच्या सज्जतेची क्षमता तपासणे, आग विझवण्यासाठी आवश्यक यंत्रणा आणि उपकरणांची सद्यस्थिती काय होती, आपत्तीचा घटनाक्रम आणि बचावकार्य सुरू करण्यासाठी यंत्रणांनी घेतलेला वेळ, विविध शासकीय विभाग आणि यंत्रणांमधील परस्पर समन्वय, यंत्रणेचा हलगर्जीपणा किंवा सदोष व्यवस्थेमुळे नुकसानीचे प्रमाण वाढले का, याचा शोध घेणे. संबंधित विभाग किंवा संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे, आगीसारखी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, याच्या शिफारशी. या मुद्द्यांवर चौकशी करून महसूल सचिव आपला अहवाल सादर करणार आहेत.
समितीकडून दाव्यांची पडताळणी सुरू
नुकसानभरपाईसाठी आलेल्या दाव्यांची पडताळणी समितीने सुरू केली आहे. आग लागल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या उशिरा पोहोचल्याच्या आरोपांचीही सखोल चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.


