‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ भारताच्या आर्थिक वाढीसाठी महत्त्वाचे

भारताच्या आर्थिक वाढीला चालना देण्यात ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ (व्यवसाय सुलभता) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. उद्योग-व्यवसाय सुलभतेने चालवण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारांसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी या संकल्पनेची मदत होते, असे आयकर विभागाचे संयुक्त आयुक्त अभिषेक त्रिपाठी यांनी सांगितले.


3 hours ago
‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ भारताच्या आर्थिक वाढीसाठी महत्त्वाचे

गाेवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
भारताच्या आर्थिक वाढीला चालना देण्यात ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ (व्यवसाय सुलभता) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. उद्योग-व्यवसाय सुलभतेने चालवण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारांसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी या संकल्पनेची मदत होते, असे आयकर विभागाचे संयुक्त आयुक्त अभिषेक त्रिपाठी यांनी सांगितले.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित ‘व्हायब्रंट गोवा’ परिषदेत जीसीसीआयतर्फे घेण्यात आलेल्या एका सत्रात त्रिपाठी म्हणाले की, केंद्र सरकारने ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ या संकल्पनेचे महत्त्व सुरुवातीपासूनच ओळखले आहे. जागतिक बँकेने आता या संकल्पनेसाठी ‘बिझनेस रेडी’ हा नवीन उपक्रम सुरू केला असून, त्याद्वारे देशातील उद्योग-व्यवसायासाठी पोषक असलेल्या वातावरणाचे मूल्यांकन केले जाते.
त्रिपाठी यांनी पुढे सांगितले की, ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ या निकषांवर शहरांचे मानांकन दाखवणारे फलक मी शालेय जीवनात पाहत असे. या फलकांनी आमच्या पिढीवर खोल प्रभाव पाडला. ही संकल्पना केवळ उद्योग आणि गुंतवणुकीपुरती मर्यादित नाही. नागरिकांना सरकारी विभागांशी संपर्क साधणे, आपल्या समस्या सोडवून घेणे आणि सरकारी सेवा सुलभतेने मिळणे हेदेखील यात तितकेच महत्त्वाचे आहे.
उद्योग-व्यवसायाशी संबंधित संस्थांना सुलभतेने आणि प्रभावीपणे काम करता यावे, तसेच नागरिक, उद्योग आणि सरकार यांच्यात सुलभ संवाद घडून यावा, हाच या संकल्पनेचा मुख्य हेतू आहे, असे त्रिपाठी यांनी स्पष्ट केले. ‘बिझनेस रेडी’ उपक्रमाची जबाबदारी मिळणे ही माझ्यासाठी वैयक्तिक पातळीवर अभिमानास्पद बाब होती. एक नागरिक म्हणून ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ या संकल्पनेचा परिणाम मी आधी अनुभवला आहे आणि आता एक सरकारी अधिकारी म्हणून तिच्या अंमलबजावणीत योगदान देण्याची संधी मला मिळाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
‘बिझनेस रेडी’विषयी योग्य धारणा तयार करणे महत्त्वाचे
कर आकारणी हा उद्योग-व्यवसायाच्या वातावरणातील तुलनेने कमी चर्चेत येणारा विषय असला, तरी ‘बिझनेस रेडी’ उपक्रमाविषयी लोकांच्या मनात योग्य धारणा तयार करणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांत जगातील सुमारे २० शहरांमध्ये वेगवेगळ्या व्यासपीठांवर या उपक्रमाची संकल्पना आणि उद्दिष्टे मांडण्यात आली आहेत, असेही अभिषेक त्रिपाठी यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा