पणजी : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक विकास देयकर यांच्याविरोधात कायदेशीर तसेच विभागीय कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस महासंचालक (डीजीपी) आलोक कुमार (DGP Alok Kumar) यांनी दिली. खात्यात असले प्रकार सहन केले जाणार नसून, कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्याविरोधात आवश्यक ती कारवाई सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कायदेशीर प्रक्रियेसोबतच पोलीस खात्याच्या स्तरावरही विभागीय कारवाई हाती घेण्यात आली आहे.
दक्षिण गोव्यातील (South Goa) एका अल्पवयीन मुलीवर गुन्हा शाखेत (Crime Branch) लैंगिक शोषण करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास देयकर यांच्यासह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पत्रकारांना डीजीपी आलोक कुमार यांना विचारले असता, त्यांनी वरील माहिती दिली. अल्पवयीन मुलीशी संबंधित हे प्रकरण संवेदनशील असल्याने पुढील तपास आणि कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात जुने गोवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.


