मोबाईल चोराची पोलिसांवर दगडफेक कॉन्स्टेबल जखमी

नागरिकांच्या मदतीने संशयिताला पकडले; मोबाईल चोरी करून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयिताने पोलिसांवर दगडफेक केली. या हल्ल्यात मडगाव पोलीस (Margao Police Station) ठाण्याचे कॉन्स्टेबल साईश कवळेकर जखमी झाले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
मोबाईल चोराची पोलिसांवर दगडफेक कॉन्स्टेबल जखमी

मडगाव : मोबाईल चोरी करून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयिताने पोलिसांवर दगडफेक केली. या हल्ल्यात मडगाव पोलीस (Margao Police Station) ठाण्याचे कॉन्स्टेबल साईश कवळेकर जखमी झाले. डोक्याला दगड लागून रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेतही त्यांनी संशयिताचा पाठलाग सुरू ठेवला. अखेर स्थानिक नागरिकांच्या मदतीने समीर खान याला पकडण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांवर दगडफेक करण्याची ही घटना शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास आके, मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकनजीक घडली. पोलीस कॉन्स्टेबल साईश कवळेकर हे गंगा वाईन्सजवळ नियमित गस्तीवर असताना संशयित समीर खान हा तीन मोबाईल फोन घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्याच्याकडे मोबाईलबाबत विचारपूस केली असता, त्याने पोलिसांशी झटापट करून तेथून पळ काढला.
संशयित व्हिक्टर हॉस्पिटलच्या दिशेने पळत असताना कवळेकर यांनी त्याचा पाठलाग केला. यावेळी संशयिताने मागून त्यांच्या दिशेने जोरात दगड भिरकावला. हा दगड थेट त्यांच्या डोक्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला. मात्र, जखमी अवस्थेतही त्यांनी पाठलाग थांबवला नाही.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळाल्याने संशयिताला घेरून पकडण्यात आले.
जखमी कॉन्स्टेबल साईश कवळेकर यांना तातडीने उपचारासाठी व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी समीर खान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक रणजीतकुमार देसाई पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा