पणजी: अमली पदार्थांच्या सेवनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यामध्ये तसेच नशामुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी पालकांनी लहान मुलांवर योग्य संस्कार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोवा दमण आणि दीव स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई (Rohidas Desai, President of the Goa, Daman and Diu Freedom Fighters' Association) यांनी केले.
शनिवारी पणजीत झालेल्या समर्पण २०२६ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रितम राणे, दशरथ परब, विवेक पार्सेकर, डॉ.पूनम फळ, अनिता परेरा, नमिता परुळेकर, ॲड. हर्षा नाईक उपस्थित होते.
देसाई यांनी सांगितले की, मुलांचे आरोग्य, सुरक्षा आणि नशा मुक्ती याबाबत जागृती करण्यासाठी आयोजित केलेला समर्पण हा कार्यक्रम स्तुत्य उपक्रम आहे. विद्यार्थ्यांवर प्राथमिक संस्कार हे आई-वडिलांकडूनच होत असतात. साधारणपणे ७० टक्के संस्कार आई वडील करतात. शाळेतील शिक्षक २० टक्के तर मित्र व अन्य लोक १० टक्के संस्कार करतात. विद्यार्थी आपल्या आई-वडिलांसोबतच अधिक वेळ घालवतात. त्यामुळे चांगला नागरिक बनवण्यासाठी,नशामुक्तीसाठी पालकांची जबाबदारी अधिक आहे.
ते म्हणाले, मुलांनी आपले मित्र मंडळी कसे आहेत याचाही विचार करावा. चांगले, वाईट यांचा विचार करूनच संगत करावी. पालक भल्यासाठीच एखादी गोष्ट सांगत असतात. त्यामुळे त्यांचे ऐकणे आवश्यक आहे. पूर्वी गोव्यात पोर्तुगीज हुकूमशाही होती. गोव्याला मुक्ती मिळवण्यासाठी आमच्या सारख्या स्वातंत्र्यसैनिकांना अनेक त्रास सहन करावे लागले. आजच्या पिढीसमोर ही समस्या नाही. त्यामुळे त्यांनी चांगले शिक्षण घ्यावे. आपल्या शिक्षणाचा इतर लोकांना फायदा झाला पाहिजे. शिक्षणाचा वापर समाजाची मदत करण्यासाठी करावा.
तत्पूर्वी प्रितम राणे यांनी समर्पण कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. ते म्हणाले, सेवाभाव तसेच समाजाला काहीतरी देण्याच्या हेतूने मागील पाच वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाचे रूपांतर आता एका चळवळीत झाले आहे. मुलांमध्ये वेळेत जागृती केल्यास त्यांचे जीवन बदलू शकते. आजची पिढी हुशार आहे. तसेच त्यांच्यासमोर आव्हाने देखील अधिक आहेत. यासाठीच आम्ही यंदा आरोग्य, बालहक्क आणि नशा मुक्ती या विषयांवर जागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.


