पुढील वर्षी मीच मुख्यमंत्री असेन: डॉ. प्रमोद सावंत

गोव्यातील मिरामार बीचवर आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेच्या सहाव्या आवृत्तीचा शुभारंभ झाला. गोव्याचे जागतिक क्रीडा क्षेत्रातील स्थान बळकट झाल्याचे सांगत पुढील वर्षीही ही स्पर्धा गोव्यातच होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
44 mins ago
पुढील वर्षी मीच मुख्यमंत्री असेन: डॉ. प्रमोद सावंत

पणजी : आयर्नमॅन ७०.३ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेची सहावी आवृत्ती मिरामार बीचवर उत्साहात सुरू झाली असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बोलताना त्यांनी गोव्याची ओळख आता केवळ पर्यटन पुरती मर्यादित न राहता जागतिक क्रीडा स्थळ म्हणून उंचावली असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे, पुढील वर्षीदेखील ही स्पर्धा गोव्यातच होईल आणि मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः उपस्थित राहीन, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जागतिक क्रीडा उत्कृष्टता आणि सहनशक्तीचा हा सोहळा गोव्याच्या लौकिकामध्ये भर घालणारा ठरला आहे.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगभरातील खेळाडूंचा सहभाग उत्तरोत्तर वाढताना दिसत आहे. यंदाच्या सहाव्या आवृत्तीमध्ये तब्बल ३० देश आणि ३०० शहरांचे प्रतिनिधित्व करणारे २ हजारहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. सन २०१९ मध्ये जेव्हा या स्पर्धेची पहिली आवृत्ती पार पडली होती, तेव्हा सुमारे १ हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यावरून या स्पर्धेचा वाढता आवाका स्पष्ट होतो. आतापर्यंत एकूण ६८ देशांतील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून गोव्याचा जागतिक क्रीडा नकाशावरील प्रभाव अधिक प्रबळ झाला आहे.

उद्घाटन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या बदलत्या प्रतिमेवर सर्वांचे लक्ष वेधले. गोव्याची ओळख केवळ 'सन, सँड अँड सी' एवढ्यापुरतीच सीमित नसून गोवा आता धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक आणि स्पोर्ट्स क्षेत्रांतील योगदानामुळेही जगभरात ओळखला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध पार्श्वभूमी असलेल्या क्रीडापटूंना एका व्यासपीठावर आणणाऱ्या या स्पर्धेला शासनाचा नेहमीच पूर्ण पाठिंबा राहील, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आगामी आवृत्त्यांच्या यशस्वी आयोजनाबद्दलही सकारात्मकता दर्शवली.


हेही वाचा
सर्व पहा