मडगाव : जागा छोटी असली तरी मनात जिद्द असल्यास त्यातून चांगला आर्थिक फायदा मिळवता येतो, हे नावेलीतील क्लिओपेट्रा कुतिन्हो यांनी दाखवून दिले आहे. कृषी खात्याच्या मार्गदर्शनातून त्यांनी घराच्या परिसरातच सेंद्रिय पद्धतीने फळभाज्या, पालेभाज्या आणि फळझाडांची लागवड करून स्वयंपूर्णता साधली असून, युवा पिढीसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
नावेलीतील सिकेटी येथे राहणाऱ्या क्लिओपेट्रा यांच्या कुटुंबाचा शेतीशी जुना संबंध आहे. ही जागा त्यांच्या आई-वडिलांनी ४५ वर्षांपूर्वी खरेदी केली होती. त्यापूर्वी त्यांचे आजोबा पिर्मेंतो कुतिन्हो हेही शेतकरी होते. आई-वडिलांनी या जागेत माड आणि केळीची लागवड केली होती. बहिणीचे लग्न झाले असून भाऊ जहाजावर कामाला असतो. त्यामुळे क्लिओपेट्रा यांनी स्वतः पुढाकार घेत पूर्वजांचा हा शेतीचा वारसा पुढे चालवण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला क्लिओपेट्रा या एका पर्यटन सेवा संस्थेत नोकरी करत होत्या. २०१८ मध्ये शेतकरी कार्डसाठी अर्ज केल्यानंतर त्यांचा शेतीविषयीचा रस वाढत गेला. कोविड महामारीच्या काळात नोकरीवर परिणाम झाल्यावर त्यांनी पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अडचणी आल्या, तरी त्यांनी हार मानली नाही. विभागीय कृषी अधिकारी शेरीफ फुर्तादो यांच्यासह वरद सामंत, राजेश नाईक, वंदित नाईक, स्टेला आणि लिझा यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
परसबागेत विविध पिकांचे नंदनवन
क्लिओपेट्रा यांच्या शेतात मिरची, काळी लांब वांगी, हिरवी व लाल भेंडी, मुळा, लाल भाजी, कांदा, पडवळ, दुधी भोपळा, घोसाळी आणि चिबूड यांची लागवड करण्यात आली आहे. फळझाडांमध्ये शंभर वर्षांचे मानकुराद आणि अफान्सो आंब्याची झाडे, सुपारी, वेलची केळी, लाल केळी यांच्यासह चंदन व मियाझाकी आंब्याच्या झाडांचा समावेश आहे. उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करून त्यांनी घराच्या परसात शेतीचे नंदनवन फुलवले आहे.

सेंद्रिय खतांचा वापर, उत्पादनांची विक्री
१) शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे टाळून त्यांनी गांडूळ खत आणि जीवामृताची निर्मिती केली आहे, ज्यामुळे उत्पादन खर्चात मोठी घट झाली आहे.
२) त्यांच्या शेतातील ताज्या भाज्यांना स्थानिक ग्राहकांकडून उत्तम मागणी आहे.
३) नावेलीतील ‘गोवा फार्मर्स मार्केट’ आणि फलोत्पादन विभागाच्या केंद्रांवरही त्यांच्या कृषी उत्पादनांची नियमित विक्री केली जाते.

जमिनीला विकण्यासाठी मोठी मागणी असतानाही त्यांनी ती न विकण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. वडिलांचे स्वप्न आणि पूर्वजांचा वारसा जपत या शेतीचा आणखी विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे. कष्ट केल्यास कृषी क्षेत्रात चांगला फायदा मिळतो, असा क्लिओपेट्रा यांचा विश्वास आहे.


