कळंगूट घरफोडीप्रकरणी पारधी गँगचे तिघे अटकेत

मध्य प्रदेशात कळंगुट पोलिसांची कारवाई; व्हिलामधून रोकड लुटली होती

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
5 mins ago
कळंगूट घरफोडीप्रकरणी पारधी गँगचे तिघे अटकेत

पणजी : कळंगुट येथील आलिशान व्हिलामध्ये चोरी करून रोकड लुटल्याप्रकरणी कुख्यात ‘पारधी गँग’च्या तीन सदस्यांना कळंगुट पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे. शिवपुरी आणि अशोकनगर जिल्ह्यांत विशेष मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली. संशयितांना ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणण्यात आले आहे.

९ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेचारच्या सुमारास पोरबोवाडो येथील ‘ऑर्चर्ड व्हिला’च्या क्रमांक ३७ मध्ये चार दरोडेखोरांनी स्वयंपाकघराच्या खिडकीतून प्रवेश केला होता. स्क्रूड्रायव्हर, सुरा आणि गलोलचा धाक दाखवून रहिवाशांवर हल्ला करत त्यांनी रोकड लुटली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत पोलिसांनी संशयितांचा मध्य प्रदेशातील ठावठिकाणा शोधला.

अटक केलेले तिन्ही संशयित कुख्यात ‘पारधी गँग’चे सदस्य असल्याचे तपासात समोर आले आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने दुर्गम भागात ही मोहीम राबवण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संशयितांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर त्यांना गोव्यात आणण्यात आले.

पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक लक्षी आमोणकर आणि उपनिरीक्षक राजाराम बागकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. लुटलेली रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली हत्यारे हस्तगत करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील सतानवाडा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने पोलिसांनी हरचंद रतनलाल मोगिया आदिवासी (३७, रा. चितोरा, सतानवाडा) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मंगल मोंगिया आणि अरुण मोंगिया यांचा सहभाग असल्याची माहिती दिली. त्यानंतर अशोकनगर जिल्ह्यातील कुरवाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून मंगल केशु गया मोंगिया (४५) आणि अरुण मंगल मोंगिया (१८) यांना अटक करण्यात आली.


हेही वाचा
सर्व पहा