लग्न नोंदणी दाखल्यावर आता असतील वर-वधूची छायाचित्रे

गोव्यात लग्न नोंदणी दाखल्यावर वर-वधुचा फोटो असणार असून डेस्टिनेशन वेडिंग जोडप्यांना स्थानिक नोंदणी सुविधा आणि वाढते घटस्फोट रोखण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन केंद्रे सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
34 mins ago
लग्न नोंदणी दाखल्यावर आता असतील वर-वधूची छायाचित्रे

पणजी : गोवा सरकारच्या नोंदणी विभागातर्फे आयोजित पहिल्या 'नोंदणी दिन' सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरिक-केंद्रित सेवांचा विस्तार करत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणांची घोषणा केली आहे. यापुढे गोव्यात विवाह नोंदणी दाखल्यावर वर आणि वधूची छायाचित्रे प्रसिद्ध केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक सेवेप्रती विभागाची बांधिलकी आणि नोंदणी प्रणाली अधिक पारदर्शक व सुलभ करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

नागरिक-केंद्रित सेवांसाठी गोवा सरकारचा तंत्रज्ञानावर भर: मुख्यमंत्री डॉ. सावंत

गोवा हे देशातील प्रमुख 'डेस्टिनेशन वेडिंग' स्थळ असल्याने, येथे विवाह बंधनात अडकणाऱ्या जोडप्यांसाठी स्थानिक नोंदणी कार्यालयातच विशेष विवाह नोंदणी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासोबतच, समाजातील घटस्फोटांचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्यावर उपाय म्हणून प्रत्येक नोंदणी कार्यालयात विवाहापूर्वी समुपदेशन (Pre-marital Counseling) केंद्रे सुरू केली जातील, असेही डॉ. सावंत यांनी नमूद केले. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सेवा अधिक गतिमान करण्यासाठी डिचोली, वाळपई आणि काकोडा येथे नवीन नोंदणी कार्यालये उभारण्यात येणार आहेत.

प्रशासकीय पारदर्शकता वाढवून प्रत्येक नागरिकाला जलद व सुलभ सेवा पुरवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. या सुधारणांमुळे गोव्यातील विवाह नोंदणी प्रक्रिया अधिक आधुनिक, सुरक्षित आणि सुटसुटीत होणार आहे.


हेही वाचा
सर्व पहा