वास्को अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून ५०० हून अधिक दुकाने वाचवली

संडे मार्केट आगीच्या दुर्घटनेवर वास्को अग्निशामक दलाचे स्टेशन फायर ऑफिसर दिलीप बिचोलकर यांनी स्पष्टीकरण दिले असून, ५०० दुकाने वाचवल्याचे सांगत दलावरील टीका चुकीची असल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
6 mins ago
वास्को अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून ५०० हून अधिक दुकाने वाचवली

वास्को: येथील गजबजलेल्या संडे मार्केटमध्ये काही दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण गोव्यात खळबळ उडवून दिली होती. या घटनेनंतर अग्निशामक दलाच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर तीव्र सवाल उपस्थित केले जाऊ लागले होते. दलाचे पथक घटनास्थळी उशिरा पोहोचले आणि त्यांनी निकृष्ट सेवा दिली, असा आरोप व्यापाऱ्यांनी केला होता. या सर्व वादानंतर वास्को अग्निशामक दलाचे स्टेशन फायर ऑफिसर दिलीप बिचोलकर यांनी समोर येत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे आणि दलाची बाजू मांडताना ५०० हून अधिक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून यशस्वीरीत्या वाचवल्याचा दावा केला आहे.

घटनास्थळाची भौगोलिक परिस्थिती अत्यंत किचकट आणि दाट लोकवस्तीची होती. रस्ते अत्यंत अरुंद असल्यामुळे आणि घटनास्थळी जमलेली प्रचंड गर्दी यामुळे गाड्यांना पुढे नेण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता. असे असतानाही जवानांनी कोणतीही दिरंगाई न करता अत्यंत कमी वेळेत घटनास्थळी धाव घेतली होती, हे जीपीएस ट्रॅकिंग आणि कॉल रेकॉर्डवरून स्पष्ट होते, असे बिचोलकर यांनी सांगितले. आग विझवण्याचे काम सुरू असताना काही स्थानिक आणि व्यापाऱ्यांनी हुज्जत घातली. शिवीगाळही झाली आणि त्यांच्याकडून शासकीय कर्तव्यात अडथळे आणले गेले. मात्र, लोकांचे दुःख आणि त्यांचे झालेले नुकसान पाहता आपण त्यांच्या भावना समजू शकतो, असेही ते म्हणाले. 

आगीचे स्वरूप अत्यंत रौद्र होते आणि संडे मार्केटमध्ये प्लास्टिक, पॉलिथीन तसेच इतर अतिज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे आग वाऱ्याच्या वेगाने पसरली. तांत्रिक बाजूंचा विचार करता, आगीच्या एका बाजूला संडे मार्केटमधील १५ ते २० दुकाने होती तर दुसऱ्या बाजूला ५०० हून अधिक दुकाने व व्यावसायिक संकुले होती. जर जवानांनी सुरुवातीलाच दुसरी बाजू न सांभाळता चुकीची रणनीती आखली असती, तर संपूर्ण बाजारपेठ बेचीराख झाली असती. जवानांनी जिगरबाज पणे पुढे होत प्लास्टिक आणि पॉलिथीनचे आच्छादन ओढून बाजूला केले, यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, डाव्या बाजूची दुकाने आगीच्या आहारी आधीच गेल्यामुळे तिथल्या दुकानदारांचे झालेले नुकसान पाहून आपल्यालाही तीव्र वेदना झाल्याचे त्यांनी नमूद केले.

या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर पसरलेल्या अनेक गैरसमजांवरही बिचोलकरांनी प्रकाश टाकला. प्रत्येक फायर टेंडरमध्ये साडेचार हजार लिटरहून अधिक पाणी होते. तसेच नौदल आणि शिपयार्डच्या गाड्यांच्या मदतीने 'रिले पद्धतीचा' वापर करून अखंड पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला होता. काही लोकांनी फोमच्या वापरावरून प्रश्न उपस्थित केले, परंतु फोमचा वापर केवळ पेट्रोल किंवा डिझेलसारख्या प्रज्वलित होणाऱ्या द्रव्यांवर केला जातो. येथे लाकूड, कापड आणि कागदासारखे साहित्य असल्यामुळे पाण्याचा मारा करणेच वैज्ञानिकदृष्ट्या एकमेव पर्याय होता, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, महापालिकेच्या पाहणीत अग्निशामक हायड्रंट्स बंद किंवा खंडित असल्याचे आढळले, ज्यामुळे पाण्याचा पूरक साठा मिळण्यात मोठा अडथळा निर्माण झाला. बहुतांश दुकानांमध्ये अग्निरोधक यंत्रणेचा किंवा सुरक्षेच्या 'एनओसी'चा अभाव असल्याचेही समोर आले असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी व्यापारी आणि प्रशासनाने कठोर नियम पाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा