पणजी: मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेला काँग्रेस पक्षाकडून होणाऱ्या विरोधावर केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी रविवारी जोरदार निशाणा साधला. काँग्रेसचा या प्रक्रियेला विरोध आहे की ते निवडणूक उत्तरदायित्वाच्याच विरोधात आहेत, असा सवाल करत पारदर्शक व अचूक मतदार याद्या या लोकशाहीचे पवित्र रक्षण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. गोवा भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शेखावत म्हणाले की, मतदार याद्यांचे पुनरीक्षण ही देशातील लोकशाही मजबूत करण्यासाठी केली जाणारी एक संवैधानिक प्रक्रिया आहे. मात्र काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष केवळ राजकीय फायद्यासाठी या प्रक्रियेला वादाच्या भोवऱ्यात ओढत आहेत. सरकारच्या धोरणांवर, निर्णयांवर आणि दृष्टिकोनावर विरोधकांनी जरूर टीका करावी, परंतु केवळ राजकीय सोयीसाठी स्वच्छ मतदार याद्या तयार करण्याच्या प्रक्रियेला विरोध करण्याचे नेमके कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गेल्या दोन दशकांत भारताने मोठ्या प्रमाणावर स्थलांतर आणि नागरीकरण अनुभवले असल्याचे सांगत शेखावत म्हणाले की, शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि चांगल्या आरोग्य सुविधांसाठी गेल्या २० वर्षांत सुमारे ४० कोटी लोकांनी स्थलांतर केले आहे, तर याच काळात सुमारे २० कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अनेक नागरिकांची नावे त्यांच्या मूळ गावी आणि नवीन वास्तव्याच्या ठिकाणी अशा दोन्ही ठिकाणी नोंदवली गेली आहेत. अशा दुहेरी नोंदणी शोधून काढण्याचे काम 'एसआयआर' प्रक्रियेद्वारे अत्यंत पारदर्शकपणे केले जात आहे.
मृत व्यक्ती, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले नागरिक, दुहेरी नोंदणी आणि पडताळणीदरम्यान न सापडलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीतून हटवण्याला विरोधकांचा आक्षेप का आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. या प्रक्रियेदरम्यान सुमारे १३ कोटी अयोग्य नोंदी वगळण्यात आल्या असून यात २.८ कोटी मृत व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे, तर १.९ कोटी नवीन पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. एका व्यक्तीला एकच मत हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार टिकवून ठेवण्यासाठी अचूक मतदार यादी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


