बेतोडा ग्रामसभेत संतप्त ग्रामस्थांना शांत करताना पोलीस.
फोंडा : पंचायत क्षेत्रात मेगा प्रकल्पांना परवानगी देऊ नये, असा ग्रामसभेचा ठराव असतानाही पंचायत मंडळाने प्रकल्पाला मंजुरी दिल्याने बेतोडा ग्रामसभेत रविवारी जोरदार गदारोळ झाला. मागील ग्रामसभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यासाठी सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करण्यास ग्रामस्थांनी नकार दिल्याने सरपंच अक्षय गावकर यांनी ग्रामसभा तहकूब केली. यावेळी वाद वाढल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
१९ जुलै रोजी झालेल्या ग्रामसभेत पंचायत क्षेत्रात मेगा प्रकल्पांना परवानगी देऊ नये, असा ठराव घेण्यात आला होता. मात्र, २९ जुलै रोजी पंचायत मंडळाने एका मेगा प्रकल्पाला परवानगी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या विषयावर चर्चा करण्यास सरपंचांनी नकार दिला. प्रकरण न्यायालयात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील ग्रामसभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यासाठी सूचक व अनुमोदक मिळाले नसल्याने ग्रामसभा तहकूब करण्यात आल्याचे सरपंचांनी सांगितले.
ज्ञानेश्वर खांडेपारकर आणि देवेंद्र च्यारी यांनी ग्रामसभेचा ठराव डावलून प्रकल्पाला परवानगी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. संबंधित प्रकल्पमालकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, जमिनीच्या संरक्षणासाठी कायदेशीर लढा सुरू ठेवणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. सरकारने स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
लंगडेश्वर आजोबांना गाऱ्हाणे; मोर्चाचा इशारा
ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी जागृत लंगडेश्वर आजोबा देवस्थानात जाऊन पंचायत क्षेत्रातील जमिनीचे संरक्षण व्हावे आणि पंचायत मंडळाला सद्बुद्धी मिळावी, यासाठी गाऱ्हाणे घातले. ग्रामस्थांच्या ठरावाला महत्त्व न दिल्याची भावना ज्ञानेश्वर खांडेपारकर आणि देवेंद्र च्यारी यांनी व्यक्त केली. दरम्यान, ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर ग्रामस्थांनी रविवारी संध्याकाळी बैठक घेऊन पुढील आठवड्यात अचानक पंचायत कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला.


