लैंगिक अत्याचार प्रकरणात पुराव्याअभावी संशयित निर्दोष

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
01st November, 11:36 pm
लैंगिक अत्याचार प्रकरणात पुराव्याअभावी संशयित निर्दोष

पणजी : संशयिताने लग्नास थेट नकार दिला नव्हता, तर दोघांचे धर्म वेगळे असल्याने दोन्ही कुटुंबांच्या तीव्र विरोधामुळे हे लग्न होऊ शकले नसल्याचे पीडितेने उलटतपासणीत दिलेल्या जबाबात समोर आले. तसेच दोघांमधील संबंध संमतीने होते असे तिने सांगितले. याची दखल घेऊन मेरशी येथील जलदगती न्यायालयाने मूळ पश्चिम बंगालच्या २४ वर्षीय संशयिताची लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार प्रकरणात पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. याबाबतचा आदेश डॉ. पूजा कवळेकर यांनी दिला.

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून हणजूण पोलिसांनी ६ जानेवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल केला. त्यानुसार, मूळ पश्चिम बंगालचा २४ वर्षीय संशयित बार्देश येथील एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये व्यवस्थापक म्हणून कामाला होता. नोव्हेंबर २०२३ मध्ये तक्रारदार युवती त्याच ठिकाणी कामाला लागली. ५ ते २८ डिसेंबर २०२३ दरम्यान संशयिताने लग्नाचे आश्वासन देऊन गेस्ट हाऊसमध्ये अनेकदा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. याची दखल घेऊन हणजूण पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, युवतीची वैद्यकीय तपासणी केली असता, ती गरोदर असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी १ मार्च २०२४ रोजी संशयिताला अटक केली. २ मार्च २०२४ रोजी पोलिसांनी संशयिताविरोधात जलदगती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी न्यायालयाने १५ जून २०२४ रोजी प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन संशयित विरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला. याच दरम्यान संशयिताला ३० आॅगस्ट २०२४ रोजी सशर्त जामीन मंजूर केला. न्यायालयाने ८ आॅगस्ट २०२६ रोजी संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

संमतीने संबंध असल्याची पीडितेची साक्ष

न्यायालयात सुनावणी झाली असता, साक्षीदारांच्या आणि पीडितेच्या उलटतपासणीतून महत्त्वाची वस्तुस्थिती समोर आली. त्यात पीडित युवती सज्ञान असून दोघांमधील संबंध संमतीने होते, असे तिने मान्य केले. तसेच संशयिताने लग्नास थेट नकार दिला नव्हता, तर दोघांचे धर्म वेगळे असल्याने दोन्ही कुटुंबांच्या तीव्र विरोधामुळे हे लग्न होऊ शकले नसल्याचे पीडितेने उलटतपासणीत जबाब दिला. याची दखल घेऊन न्यायालयाने मूळ पश्चिम बंगालचा रहिवासी असलेल्या २४ वर्षीय संशयिताची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. 

हेही वाचा
सर्व पहा