लैंगिक शोषणप्रकरणी संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

लग्नाची माहिती लपवून पीडितेची फसवणूक

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
31st October, 11:43 pm
लैंगिक शोषणप्रकरणी संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मडगाव : लग्नाची माहिती लपवून पीडितेचे लैंगिक शोषण करणे, तिला वारंवार गर्भपात करण्यास भाग पाडणे आणि फसवणूक केल्याच्या आरोपांप्रकरणी संशयित अर्जुन राम याचा अटकपूर्व जामीन अर्ज दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

न्यायाधीश शर्मिला पाटील यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. तपासाच्या दृष्टीने संशयिताची पोलीस कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला अर्जुन राम हा वेर्णा औद्योगिक वसाहतीत कामगार पुरवठादार म्हणून काम करतो. पीडितेच्या तक्रारीनुसार, जुलै २०२४ मध्ये नोकरीच्या शोधात असताना त्याची तिच्याशी ओळख झाली. आपण अविवाहित असल्याचे भासवून त्याने तिचा विश्वास संपादन केला आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर २८ ऑगस्ट २०२४ रोजी बनारस येथील एका मंदिरात दोघांनी विवाह केल्याचा दावा पीडितेने केला आहे.

या संबंधातून पीडिता सुमारे पाचवेळा गर्भवती राहिली. मात्र, कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदार्‍यांचे कारण देत संशयिताने प्रत्येकवेळी तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप तिने केला आहे. जानेवारी २०२६ मध्ये एक महिला तीन मुलांसह अर्जुनच्या घरी राहण्यास आली. तिने आपण अर्जुनची कायदेशीर पत्नी असल्याचे सांगितल्याने संशयिताने पहिल्या विवाहाची माहिती लपविल्याचे उघड झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, अर्जुनने तिला आपल्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करून तिचा छळ केल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी वेर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, संशयित अर्जुन राम याने सर्व आरोप फेटाळून लावले. बदनाम करण्याच्या उद्देशाने खोटी तक्रार करण्यात आल्याचा दावा त्याने केला. पीडितेने पैशांची मागणी करून धमकावल्याने आपण आणि आपल्या पत्नीने २५ ऑगस्ट रोजी वेर्णा पोलिसांत तक्रार दाखल केली होती, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला. तसेच, आपण तपासात सहकार्य करण्यास तयार असून पळून जाण्याची शक्यता नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.

मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर पीडितेने यापूर्वीच ४ ऑगस्ट रोजी फसवणुकीची तक्रार दाखल केल्याची नोंद घेतली. सध्या पीडिता गर्भवती असून गर्भातील बाळाचे जैविक पितृत्व निश्चित करण्यासाठी डीएनए तपासणी तसेच संशयिताची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यासाठी संशयिताची पोलीस कोठडीत चौकशी महत्त्वाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने संशयित अर्जुन राम याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. 

हेही वाचा
सर्व पहा