अपघातात मुलाचा मृत्यू; वडिलांना ३५.३३ लाखांची भरपाई

मडगाव मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाचे आदेश

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
28th October, 11:58 pm
अपघातात मुलाचा मृत्यू; वडिलांना ३५.३३ लाखांची भरपाई

मडगाव : रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुस्तफा शेख (३४) याच्या वडिलांना ३५ लाख ३३ हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश मडगाव येथील मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाने दिला आहे. विमा कंपनीसह अन्य प्रतिवाद्यांनी सहा आठवड्यांत भरपाईची रक्कम द्यावी, असे निर्देश पीठासीन अधिकारी शर्मिला पाटील यांनी दिले.
१७ जून २०१९ रोजी मुस्तफा दुचाकीने केपेहून मडगावच्या दिशेने जात असताना सां जुझे दी अरीयाल येथील चॅपलजवळ समोरून येणाऱ्या होंडा अ‍ॅक्टिव्हाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मुस्तफाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अ‍ॅक्टिव्हा चालक कायतान रिबेलो याचाही सात दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुस्तफाचे वडील कासिम शेख यांनी २० लाखांच्या भरपाईसाठी दावा दाखल केला होता. सुनावणीदरम्यान पंच साक्षीदार आणि तपास अधिकाऱ्याच्या जबाबात विसंगती आढळल्याने न्यायाधिकरणाने पोलिसांचा पंचनामा आणि अपघाताचा नकाशा ग्राह्य धरला नाही.
मुस्तफाच्या दुचाकीवरील सहप्रवासी सुलेमान ‍याच्या साक्षीनुसार, दुसऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात अ‍ॅक्टिव्हा चालकाने चुकीच्या बाजूला जाऊन मुस्तफाच्या दुचाकीला धडक दिली. या आधारे अपघात अ‍ॅक्टिव्हा चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा निष्कर्ष न्यायाधिकरणाने काढला.
मुस्तफा वडिलांचा एकमेव आर्थिक आधार
मुस्तफा प्लंबर म्हणून काम करत होता आणि वृद्ध वडिलांचा एकमेव आर्थिक आधार होता. त्याचे उत्पन्न, भविष्यातील आर्थिक नुकसान आणि अन्य कायदेशीर बाबींचा विचार करून न्यायाधिकरणाने मागितलेल्या २० लाखांपेक्षा अधिक, ३५ लाख ३३ हजार रुपयांची भरपाई मंजूर केली.

हेही वाचा
सर्व पहा