पणजी : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील अपुऱ्या आरोग्य सुविधा, अस्वच्छता, कैद्यांची गर्दी आणि पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेबाबत गोवा मानवाधिकार आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाने १३ ऑक्टोबर रोजी कारागृहाची पाहणी करून विविध सुधारणा सुचवल्या. त्यावरील कार्यवाहीचा अहवाल २३ डिसेंबरपूर्वी सादर करण्याचे निर्देश कारागृह महानिरीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला दिले आहेत.
पाहणीदरम्यान दोन कैद्यांची क्षमता असलेल्या काही कोठड्यांमध्ये तीन कैदी ठेवण्यात आल्याचे आढळले. तसेच सुमारे ७०० कैद्यांसाठी केवळ एकच फ्रिज उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आणखी एक फ्रिज, स्वयंपाकघरात एक्झॉस्ट फॅन, मच्छरदाण्या आणि पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याची शिफारस आयोगाने केली.
कैद्यांना वेळेत औषधे व उपचार पुरवणे, आयपीएचबीच्या डॉक्टरांच्या भेटी वाढवणे, रुग्णालयातील रिक्त पदे भरणे, पाण्याच्या टाकीची दुरुस्ती आणि सांडपाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्याचे निर्देश आयोगाने दिले. तसेच वॉटर प्युरिफायरची नियमित देखभाल, अंडी व केळींची दर पंधरा दिवसांनी खरेदी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती करण्याची सूचना केली.
जामीन मिळूनही १९ कैदी तुरुंगात
न्यायालयाने जामीन मंजूर करूनही १९ कैदी अद्याप कारागृहात असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आली. जामिनासाठी आवश्यक सुरक्षा रक्कम भरता न आल्याने त्यांची सुटका झालेली नाही. या प्रकरणांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती करण्यासाठी आयोग उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयांच्या न्यायाधीशांना पत्र लिहिणार आहे.
महिला कैद्याला ४५ दिवस औषधे नाहीत
पाहणीदरम्यान एका महिला कैद्याने आयोगासमोर औषधे मिळत नसल्याची तक्रार केली. अझिलो रुग्णालयातील डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे ४५ दिवस उलटूनही उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे तिने सांगितले. या तक्रारीची गंभीर दखल घेत आयोगाने संबंधित महिलेसह सर्व कैद्यांना आवश्यक औषधे वेळेत पुरवण्याचे निर्देश दिले.


