म्हापसा : तोरसे-पेडणे येथील जमीन विक्रीच्या बहाण्याने मुरगावातील महिलेची ४१.८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी साईच्छा डेव्हलपर्सचे मालक तारक मंगेश आरोलकर (४६, रा. म्हापसा) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने (फास्ट ट्रॅक कोर्ट) फेटाळला. न्या. रेइना फर्नांडिस यांनी सुनावणीअंती हा आदेश दिला.
म्हापसा पोलिसांनी ११ सप्टेंबर रोजी नोंदवलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आरोलकरने अर्ज केला होता. सुनावणीवेळी बचाव पक्षाने हा व्यवहार दिवाणी स्वरूपाचा असून तक्रारदाराच्या आजारी आईच्या उपचारांसाठी ८.५ लाख रुपये परत केल्याचा युक्तिवाद केला.
सरकारी पक्षाने जामिनाला विरोध करताना जमिनीचे अधिकृत उपविभाजन झालेले नसतानाही संशयिताने दिशाभूल करून पैसे स्वीकारल्याचे सांगितले. मूळ कागदपत्रे आणि रक्कम जप्त करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. संशयिताची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने जामीन नाकारला. संशयितातर्फे अॅड. के. पोवळेकर, तर सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील एस. रेडकर यांनी युक्तिवाद केला.
पैसे घेऊनही जमीन विक्री नाही
तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०२२ मध्ये आरोलकरने तोरसे येथील ‘रुमडाचे पाणी’ परिसरातील ५१,५६० चौरस मीटर भूखंड विक्रीचे आमिष संध्या मॅन्युएल भंडारे सिक्वेरा यांना दाखवले. त्यांच्याकडून ४१ लाख ८५ हजार ७५० रुपये स्वीकारूनही जमीन विक्री पूर्ण केली नाही किंवा रक्कम परत केली नाही, असा आरोप आहे. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२) आणि ३१८(३) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


