कार अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनीला १७ लाखांची भरपाई

करिअर, वैवाहिक आयुष्यावरील परिणामांची न्यायालयाकडून दखल

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
23rd October, 11:39 pm
कार अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनीला १७ लाखांची भरपाई

मडगाव : चांदर येथे झालेल्या कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या २२ वर्षीय विद्यार्थिनीला दक्षिण गोवा मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने १७ लाखांची भरपाई मंजूर केली आहे. अपघातामुळे विद्यार्थिनीच्या भविष्यातील रोजगाराच्या संधी, दैनंदिन जीवनातील आनंद आणि विवाहाच्या शक्यतांवर होणार्‍या परिणामांची दखल घेत न्यायाधिकरणाने हा निवाडा दिला.

न्यायाधिकरणाचे सदस्य न्यायाधीश राम प्रभूदेसाई यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. मिताली महेश पाटील (रा. शेल्डे, केपे) ही ४ मे २०१९ रोजी स्कूटरवरून नावेलीहून कुडचडेच्या दिशेने प्रवास करत होती. चांदर चॅपलजवळ समोरून येणार्‍या बोलेनो कारने तिच्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात तिच्या उजव्या पायाच्या मांडीचे व पोटरीचे हाड मोडले. गंभीर दुखापतीमुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. वैद्यकीय अहवालानुसार, अपघातामुळे तिला ३२ टक्के कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. अपघातावेळी ती केपे येथील सरकारी महाविद्यालयात कला शाखेचे शिक्षण घेत होती. या घटनेमुळे तिची दोन वर्षे वाया गेली असून, सध्या ती बीएडचे शिक्षण घेत आहे.

शिक्षिका म्हणून काम करताना अपंगत्वाचा फारसा परिणाम होणार नसल्याचा युक्तिवाद विमा कंपनीने केला होता. मात्र, न्यायाधिकरणाने तो फेटाळून लावला. शिक्षकांना विद्यार्थ्यांसोबत मैदानी व शारीरिक उपक्रमांत सहभागी व्हावे लागते, तसेच अनेक तास उभे राहून काम करावे लागते. त्यामुळे विद्यार्थिनीच्या भविष्यातील रोजगार क्षमतेवर अपंगत्वाचा परिणाम होऊ शकतो, असे निरीक्षण न्यायाधिकरणाने नोंदवले.

कारचालक व मालक ओसवाल्ड मास्कारेन्हस आणि एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी यांनी संयुक्तपणे ही भरपाई द्यावी, असे आदेश न्यायाधिकरणाने दिले आहेत. भरपाईच्या रकमेवर दावा अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून वार्षिक ६.८० टक्के दराने व्याजही देण्याचे निर्देश दिले आहेत. ही रक्कम दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयाच्या मडगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या खात्यात जमा करण्याचे आदेशही न्यायाधिकरणाने दिले आहेत.

उपचार, मानसिक वेदनांपोटी भरपाई

न्यायाधिकरणाने भविष्यातील उत्पन्नाच्या नुकसानीपोटी ११ लाख ४७ हजार ५०० रुपये, शारीरिक व मानसिक वेदनांसाठी दोन लाख रुपये, जीवनातील सुखांच्या र्‍हासासाठी २ लाख रुपये आणि विवाहाच्या शक्यतांवर परिणाम झाल्याबद्दल १ लाख रुपये मंजूर केले आहेत. याशिवाय, शारीरिक उपचारांसाठी २२ हजार ५०० रुपये, वैद्यकीय खर्चापोटी १६ हजार ९६५ रुपये आणि न्यायालयीन खर्चासाठी १५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. अशाप्रकारे एकूण भरपाईची रक्कम १७ लाख १ हजार ९६५ रुपये होते. 

हेही वाचा
सर्व पहा