गळ्यावर चाकूचा वार झाल्याने गंभीर जखमी झालेला अभिनव.
वास्को : झुआरीनगर येथे बुधवारी मध्यरात्री क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर सशस्त्र हल्ल्यात झाले. या घटनेत कौशल कुटुंबातील पाच जणांसह आठ जण जखमी झाले. त्यापैकी अभिनव कौशल, अभिषेक कौशल आणि त्यांचे वडील रामबाबू कौशल हे तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी आठ संशयितांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
चौगुले भाट परिसरात मालवाहू रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी केल्यावरून वाद सुरू झाला. त्यानंतर काही युवकांनी रिक्षाचालकाला मारहाण केली. त्याला वाचवण्यासाठी आलेल्या व्यक्तींवरही लोखंडी कांबी व चाकूने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. अभिनव कौशल, अभिषेक कौशल आणि रामबाबू कौशल हे गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी कौशल कुटुंबाच्या घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचाही फोडल्याची तक्रार आहे.
आठ संशयितांविरोधात गुन्हा
हिमांशू कौशल यांच्या तक्रारीवरून वेर्णा पोलिसांनी सुरज, दीपक, खाजा, कृष्णा नायर ऊर्फ जॉनी, लक्ष्मण आणि अन्य तीन अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक आदित्य वेळीप पुढील तपास करीत आहेत.
पोलीस गस्त वाढविण्याची मागणी
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. सांकवाळचे पंच गिरीश पिल्ले, जिपं सदस्य सुनील गावस आणि उपसरपंच तुळशीदास नाईक यांनी घटनेबद्दल संताप व्यक्त केला. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून गुंडगिरीला आळा घालावा, अशी मागणी त्यांनी केली. ही घटना आणि परिसरातील परिस्थिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सुनील गावस यांनी सांगितले.


