रावळपिंडीत थरार! श्रीलंकेचा इंग्लंडविरुद्ध विक्रमी ४३० धावांचा पाठलाग

हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ : इंग्लंडचा २ गडी १ चेंडू राखून पराभव

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
22nd October, 11:46 pm
रावळपिंडीत थरार! श्रीलंकेचा इंग्लंडविरुद्ध विक्रमी ४३० धावांचा पाठलाग

रावळपिंडी : पाकिस्तानात सुरू असलेल्या एकदिवसीय तिरंगी मालिका २०२६ मध्ये रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेलेला तिसरा सामना क्रिकेट विश्वाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवला गेला आहे. इंग्लंडने दिलेल्या तब्बल ४३० धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने अवघ्या ४९.५ षटकांत ८ गडी गमावून ४३० धावा करत हा सामना २ गडी राखून आपल्या नावावर केला. एकदिवसीय क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासातील हा सर्वात रोमांचक आणि उच्च धावसंखेचा यशस्वी पाठलाग ठरला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी रावळपिंडीच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पाडला. कर्णधार तथा फलंदाज हॅरी ब्रूकने श्रीलंकेच्या गोलंदाजीचा अक्षरशः समाचार घेत ऐतिहासिक खेळी केली. ब्रूकने केवळ ११४ चेंडूंत आपले द्विशतक पूर्ण करत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक नोंदवण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला.
यापूर्वी भारताच्या शुबमन गिलने अवघ्या २१ दिवसांपूर्वी (३० सप्टेंबर रोजी) वेस्ट इंडीजविरुद्ध ११७ चेंडूंत द्विशतक झळकावण्याचा विक्रम केला होता, जो ब्रूकने मोडून काढला. रावळपिंडीच्या मैदानावर ब्रूकने २११ चेंडूंत तब्बल २०२ धावांची नाबाद व ऐतिहासिक खेळी साकारली, ज्यामध्ये २१ चौकार आणि १० गगनचुंबी षटकांचा समावेश होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो पहिलाच इंग्लिश फलंदाज ठरला आहे.
ब्रूकव्यतिरिक्त इंग्लंडकडून विल जॅक्सने अत्यंत स्फोटक फलंदाजी करत ३० चेंडूंत नाबाद ६६ धावांची तडाखेबंद खेळी केली (ज्यात ८ चौकार आणि ८ षटकार समाविष्ट होते). तसेच जो रूटने ६६ चेंडूंत ६९ धावा, तर टॉम बेंटनने ५० धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. जोमदार फटकेबाजीच्या बळावर इंग्लंडने निर्धारित ५० षटकांत ४ बाद ४२९ अशी विशाळ धावसंख्या उभी केली. श्रीलंकेतर्फे दुनिथ वेल्ललागेने २ गडी बाद केले, तर असिता फर्नांडो आणि जनित लियानागे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या सर्वच गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
प्रत्युत्तरात ४३० धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या डावाची सुरवात अत्यंत आक्रमक झाली. सलामीवीर अविष्का फर्नांडोने ८३ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ९७ धावांची अतिशय महत्त्वाची खेळी करत संघाला भक्कम पाया रचून दिला.
त्यानंतर मधल्या फळीत पवान रथनायके (१३० चेंडूंत १५३ धावा) आणि स्फोटक फलंदाज दासुन शनाका (५० चेंडूंत ९७ धावा) यांनी मैदान मारत इंग्लंडच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले. दोघांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करत सामना पूर्णपणे श्रीलंकेच्या बाजूने झुकवला.
सामना अतिशय अटीतटीचा आणि उत्कंठावर्धक टप्प्यावर येऊन ठेपला असताना, जनित लियानागेने एक बाजू लावून धरली. त्याने अत्यंत संयमी आणि प्रसंगी आक्रमक फलंदाजी करत अवघ्या २७ चेंडूंत नाबाद ६१ धावा फटकावल्या आणि संघाला ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन सोडले. शेवटच्या षटकांत अटीतटीच्या संघर्षात श्रीलंकेने ४९.५ षटकांत ८ बाद ४३० धावा करत लक्ष्याला दिमाखात गवसणी घातली.
इंग्लंडतर्फे जोश टोंगने ३ बळी टिपले, तर सॅम करनने २ बळी मिळवले; परंतु श्रीलंकेच्या फलंदाजांच्या सरस कामगिरीसमोर त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. हॅरी ब्रूकची द्विशतकी खेळी अखेर व्यर्थ ठरली आणि श्रीलंकेने हा सामना जिंकत क्रिकेट जगतात एक नवा इतिहास रचला.
एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च यशस्वी लक्ष्याचे पाठलाग
४३५ धावा – दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, जोहान्सबर्ग, २००६
४३० धावा – श्रीलंका विरुद्ध इंग्लंड, रावळपिंडी, २०२६
४०६ धावा – भारत विरुद्ध वेस्ट इंडीज, गुवाहाटी, २०२६
३७५ धावा – नेदरलँड्स विरुद्ध वेस्ट इंडीज, हरारे, २०२३ (सुपर ओव्हरमध्ये विजय)
३७२ धावा – दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, डर्बन, २०१६
एका एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च एकूण धावसंख्या
८७२ धावा – ऑस्ट्रेलिया (४३४) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (४३८), जोहान्सबर्ग, २००६
८५९ धावा – इंग्लंड (४२९) विरुद्ध श्रीलंका (४३०), रावळपिंडी, २०२६
८२५ धावा – भारत (४१४) विरुद्ध श्रीलंका (४११), राजकोट, २००९
८११ धावा – वेस्ट इंडीज (४०५) विरुद्ध भारत (४०६), गुवाहाटी, २०२६
८०७ धावा – इंग्लंड (४१९) विरुद्ध वेस्ट इंडीज (३८९), सेंट जॉर्ज, २०१९
एकदिवसीय सामन्यात पराभूत ठरलेल्या संघातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
२०२ धावा – हॅरी ब्रूक (विरुद्ध श्रीलंका - रावळपिंडी, २०२६)
१९४ धावा* – चार्ल्स कोव्हेंट्री (विरुद्ध बांगलादेश, बुलावायो, २००९)
१९३ धावा – फखर झमान (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, २०२१)
१९१ धावा – जॉर्ज मन्सी (विरुद्ध नेदरलँड्स, डंडी, २०२५)
१८१ धावा* – मॅथ्यू हेडन (विरुद्ध न्यूझीलंड, हॅमिल्टन, २००७)