पणजी : वन्यजीव छायाचित्रकार सीताराम दिनकर राऊळ यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा गौरव वाढवला आहे. लंडन येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियमतर्फे आयोजित ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ या प्रतिष्ठित स्पर्धेत त्यांनी अपृष्ठवंशीय प्राण्यांचे वर्तन या गटात प्रथम क्रमांकाचा मान मिळवला आहे. वन्यजीव छायाचित्रणातील ‘ऑस्कर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत जगभरातून आलेल्या ६५ हजारांहून अधिक छायाचित्रांमधून त्यांच्या छायाचित्राची निवड झाली. राऊळ हे मूळचे घोटगेवाडी-दोडामार्ग येथील असून बदलापूर येथे वास्तव्यास असतात.

सामान्यतः वन्यजीव छायाचित्रण म्हटले की वाघ, सिंह आणि बिबट्यासारख्या मोठ्या प्राण्यांची छायाचित्रे डोळ्यांसमोर येतात. मात्र सीताराम राऊळ यांनी आपल्या कॅमेऱ्यात वाळवंटातील विंचवाच्या जीवनातील एक दुर्मीळ क्षण टिपला आहे. राजस्थानमधील जैसलमेर येथे काढलेल्या या छायाचित्रात विंचू वाळूत खड्डा खोदून स्वतःसाठी निवारा तयार करताना दिसतो. वाळवंटासारख्या प्रतिकूल वातावरणात जीवसृष्टी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी कशा प्रकारे अनुकूलन करते, हे या छायाचित्रातून प्रभावीपणे अधोरेखित होते. आकाराने लहान असलेल्या जीवांमध्येही उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून विकसित झालेली अद्भुत कौशल्ये असतात, हा संदेशही या छायाचित्रातून मिळतो.

४ वर्षांचा छायाचित्रणाचा अनुभव
सीताराम राऊळ हे गेल्या १४ वर्षांपासून छायाचित्रण क्षेत्रात कार्यरत आहेत. वन्यजीव छायाचित्रणासोबतच मॅक्रो फोटोग्राफी आणि सर्जनशील निसर्ग छायाचित्रणामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यावसायिक छायाचित्रणाचा अनुभव असलेल्या राऊळ यांना चित्रकलेचीही आवड आहे. छायाचित्रण हे केवळ एखादा क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचे माध्यम नसून, निसर्गाकडे पाहण्याची आणि त्यातील सौंदर्य व्यक्त करण्याची एक कलात्मक प्रक्रिया आहे, असे त्यांचे मत आहे. या यशामागे कुटुंबीय, आई-वडील, बदलापूर परिसरातील छायाचित्रकार मित्र आणि मार्गदर्शक यांचे मोठे योगदान असल्याचे राऊळ यांनी नमूद केले. बदलापूर आणि परिसरातील निसर्गाशी असलेल्या नात्याने आपल्याला समृद्ध केले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दुर्लक्षित जीवांच्या संवर्धनाला मिळणार चालना
या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे वाघ, सिंह यांसारख्या मोठ्या प्राण्यांबरोबरच विंचू, किटक आणि अन्य अपृष्ठवंशीय जीवांच्या संवर्धनाकडेही जगाचे लक्ष वेधले जाईल, अशी आशा राऊळ यांनी व्यक्त केली. आपल्या छायाचित्रांमधून निसर्गातील दुर्लक्षित पैलू जगासमोर आणण्याचा आणि निसर्गसंवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.


