दक्षिण गोव्यातील प्रलंबित म्युटेशन प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी शनिवारी विशेष शिबिर

दक्षिण गोवा जिल्ह्यातील प्रलंबित म्युटेशन प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी २४ ऑक्टोबर रोजी सासष्टी, फोंडा आणि मुरगाव तालुक्यातील मामलेदार कार्यालयांमध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
दक्षिण गोव्यातील प्रलंबित म्युटेशन प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी शनिवारी विशेष शिबिर

मडगाव: दक्षिण गोवा जिल्ह्यातील प्रलंबित म्युटेशन प्रकरणांचा वेगाने आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार निपटारा करण्यासाठी येत्या शनिवारी, २४ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सासष्टी, फोंडा आणि मुरगाव तालुक्यातील संबंधित मामलेदार व सहमामलेदार कार्यालयांमध्ये हे विशेष शिबिर पार पडणार आहे.

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस (आयएएस) यांनी यासंदर्भात अधिकृत जाहीर सूचना जारी केली आहे. प्रलंबित म्युटेशन प्रकरणांबाबत संबंधित नागरिकांनी आपल्या तालुक्यातील मामलेदार किंवा सहमामलेदार कार्यालयात उपस्थित राहून प्रकरणाची सद्यस्थिती जाणून घ्यावी आणि आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या शिबिरात येताना नागरिकांनी आपल्या प्रकरणाशी संबंधित सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे आणि पुरावे सोबत आणणे गरजेचे आहे.

प्रलंबित प्रकरणांचा कायदेशीर चौकटीत राहून जलदगतीने निपटारा करण्यासाठी सर्व मामलेदार आणि सहमामलेदारांनी आवश्यक ती प्रशासकीय व्यवस्था करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. महसूल विभागातील म्युटेशन प्रकरणे वेळेत निकाली काढून सर्वसामान्यांना दिलासा देणे आणि शासकीय कामात पारदर्शकता आणणे, हा या विशेष शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा
सर्व पहा