पणजी : गोव्यातील उत्तर गोव्यातील शिवोली भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि रहस्यास्पद घटना समोर आली आहे. शिवोली येथील एका भाड्याच्या खोलीत मूळच्या गुजरातच्या अहमदाबाद येथील रहिवासी असलेल्या एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.घराच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना संबंधित खोलीतून तीव्र दुर्गंध येऊ लागल्याने संशय बळावला. त्यानंतर स्थानिकांनी तातडीने शिवोली पंचायतीचे पंच सदस्य विल्यम फर्नांडिस आणि आऊटपोस्ट पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच शिवोली आऊटपोस्ट आणि हणजूणे पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंच व नागरिकांच्या उपस्थितीत घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, तिथे एका महिलेचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या आणि दुर्गंधीयुक्त अवस्थेत निदर्शनास आला.प्राथमिक तपासात मृत महिलेची ओळख आंचल महेश्वरी अशी पटली असून ती ५२ वर्षांची असून मूळची अहमदाबाद, गुजरात येथील राहणारी आहे. ती मागील काही काळापासून या भागात भाड्याने राहत होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर महिला फोन उचलत नसल्याने घरमालकाने तिच्या भावाशी संपर्क साधला होता, त्यानंतर हा सर्व प्रकार हळूहळू उघडकीस आला.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पुढील शवविच्छेदनासाठी गोमेकॉमध्ये पाठवण्यात आला आहे. महिला राहत असलेल्या खोलीची फॉरेन्सिक आणि पोलीस पथकाकडून कसून पाहणी केली जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास हणजूण पोलिसांकडून सुरू आहे.


