पणजी: वेगवेगळ्या पक्षांतून आलेल्या नेत्यांना सहजासहजी उमेदवारी देण्यापेक्षा एकाच पक्षात वीस वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली पाहिजे. मी स्वतः १९८४ पासून मगो पक्षात स्थिर आहे. मी जर वेळेनुसार पक्ष बदलला असता, तर कदाचित मी यापूर्वीच राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो, असे प्रतिपादन राज्याचे वीजमंत्री तथा मगो पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले आहे.
पणजी येथील विद्युत भवनात आयोजित ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमांतर्गत गुरुवारी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे राजकीय विधान केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षासोबत (भाजप) युती कायम ठेवणे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासाठी (मगो) फायदेशीर ठरेल आणि पक्षाला ही युती हवी आहे. याबाबत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी लवकरच सविस्तर बोलणी करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीच्या काळात कोणाला उमेदवारी द्यायची, याचा विचार सर्वच राजकीय पक्षांनी गांभीर्याने आणि आत्मपरीक्षण करून करायला हवा. अमुक एका विशिष्ट जातीचा आहे म्हणून त्याला थेट उमेदवारी देणे योग्य नाही. जर प्रत्येक पक्षाने पक्षनिष्ठेला प्राधान्य देऊन मूळ कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली, तर राजकारणात नक्कीच सकारात्मक आणि चांगला बदल घडून येईल, असे मत त्यांनी मांडले.

तसेच पक्षाच्या जागा वाटपाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मांद्रे मतदारसंघात सध्या मगो पक्षाचा आमदार आहे, त्यामुळे ही जागा मगो पक्षाचीच राहणार आहे. याशिवाय फोंडा, शिरोडा आणि इतर काही पारंपरिक मतदारसंघांमध्ये मगोचे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील, असा ठाम विश्वास मंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला.


