राजगीर : राजगीर इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या कर्नल सी. के. नायडू ट्रॉफी एलिट क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात गोव्याने बिहारवर विशाल आघाडी घेण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. गोव्याने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद २९५ धावांची मजल मारली. या धावसंख्येला उत्तर देताना बिहारची दुसऱ्या दिवसअखेर ९ बाद १९४ अशी अवस्था गोव्याच्या गोलंदाजांनी केली आहे.
पहिल्या दिवसाच्या ५ बाद २१७ धावांवरून पुढे खेळताना गोव्याने आणखी ७८ धावांची भर घातली. पहिल्या दिवशी नाबाद राहिलेला दिशांक मिस्किन (६२) आपल्या धावसंख्येत भर घालू शकला नाही. अनुज यादव (२८) व दीप कसवणकर (३२) यांच्या फलंदाजीमुळे गोव्याला तीनशे धावांच्या आसपास पोहोचता आले. गोव्याचा डाव १११.५ षटकांत संपला.
गोव्याच्या धावसंख्येचा पाठलाग करताना बिहारचा संघ एकवेळ ४ बाद १८५ अशा मजबूत स्थितीत होता. स्थिरावलेल्या पृथ्वी राज (९०) याला अनुज यादवच्या गोलंदाजीवर जीवनकुमारने यष्टिचीत केल्यानंतर बिहारच्या डावाला उतरती कळा लागली. काही षटकांतच त्यांचे ९ गडी तंबूत परतले. दिवसअखेर नाबाद असलेल्या आयुष आनंद (नाबाद ४१) याच्यावर बिहारच्या आशा असतील. गोव्याकडून अनुज यादवने सर्वाधिक ४ गडी बाद केले. दीप कसवणकरने ३, तर विनायक कुंटेने २ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
गोवा : पहिला डाव - ५ बाद २१७ वरून १११.५ षटकांत सर्वबाद २९५ (दिशांक मिस्किन ६२, अनुज यादव २८, दीप कसवणकर नाबाद ३२, विनायक कुंटे ९, राहुल विश्वकर्मा ४, पियुष देविदास ३, अवांतर १५, सुधांशू कुमार ३-५४, राहुल कुमार ३-६७, उत्कर्ष कुमार २-४०, वासुदेव सिंग १-६७).
बिहार : पहिला डाव - ६० षटकांत ९ बाद १९४ (शिवम राज ९, प्रशांत कुमार १५, कुमार श्रेय ३५, पृथ्वी राज ९०, मोहम्मद तौफीक १, आयुष आनंद नाबाद ४१, उत्कर्ष कुमार ०, सुमन कुमार २, वासुदेव सिंग ०, राहुल कुमार ०, सुधांशू कुमार नाबाद ०, अवांतर ४, अनुज यादव ४-५३, दीप कसवणकर ३-२४, विनायक कुंटे २-३९).


