कुंकळ्ळी कॉलेज गोवा विद्यापीठ आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचा विजेता

रोझरी कॉलेजचा ३-२ असा पराभव

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
07th October, 11:19 pm
कुंकळ्ळी कॉलेज गोवा विद्यापीठ आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचा विजेता

पणजी : गोवा विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गोवा विद्यापीठ आंतर-महाविद्यालयीन पुरुष फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ च्या अत्यंत रोमांचक आणि चुरशीच्या अंतिम सामन्यात कुंकळळी एज्युकेशन सोसायटीच्या सीईएस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, कुंकळ्ळी फुटबॉल संघाने दिमाखदार विजय मिळवला आहे. नव्वद मिनिटांच्या या अटीतटीच्या सामन्यात कुंकळ्ळीच्या संघाने रोझरी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, नावेली चा ३-२ असा पराभव करत अजिंक्यपद पटकावून चषकावरचे वर्चस्व कायम राखले आहे.
नावेली येथील रोझरी चर्च ग्राउंडवर हा अंतिम सामना खेळवण्यात आला. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मैदान गाजवले.
सामन्याच्या २९ व्या मिनिटाला रोझरी कॉलेजच्या अश्वेक जाधवले सुंदर गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, उत्तरार्धात आक्रमक खेळ करत ४५ व्या मिनिटाला सी.ई.एस. कॉलेजच्या आतिफ शेखने प्रिन्सच्या क्रॉसवर सुंदर हेडर गोल नोंदवून धावसंख्या १-१ अशी बरोबरीत आणली. पहिल्या हाफपर्यंत दोन्ही संघ समसमान राहिले.
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच (४६ व्या मिनिटाला) आतिफ शेखने पुन्हा एकदा गोल करत सी.ई.एस. कॉलेजला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ७१ व्या मिनिटाला रोझरी कॉलेजच्या ऐझान शेखने गोल करत पुनरागमन केले आणि सामना २-२ असा रोमहर्षक वळणावर आणला. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी जोरदार संघर्ष केला. अखेर, सामन्याच्या ८९ व्या मिनिटाला (शेवटच्या क्षणी) सी.ई.एस. कॉलेजच्या स्वॅवेल फुर्तादो याने उत्कृष्ट थ्रू-बॉलवर जोरदार गोल करत संघाला ३-२ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. रोझरी कॉलेजने शेवटपर्यंत झुंज दिली, परंतु कुंकळ्ळीच्या भक्कम बचावाने विजय सुकर केला.

स्वॅवेल फुर्तादो ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू
संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक ८ गोल नोंदवून संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणारा आणि उत्कृष्ट शिस्त राखणारा सी.ई.एस. कॉलेजचा खेळाडू स्वॅवेल फुर्तादो याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
सामना संपल्यानंतर पार पडलेल्या दिमाखदार बक्षीस वितरण सोहळ्याला रोझरी कॉलेजचे प्रा. हेलिक बॅरेटो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कुंकळ्ळी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विदेशक व्ही. देसाई, सी.ई.एस. कॉलेजचे प्राचार्य प्रभाकर एडविन बॅरेटो, गोवा विद्यापीठाचे माजी सहाय्यक संचालक मिल्टन फर्नांडिस, डॉ. देवाशिष बागची आणि बालचंद्र बी. जादव यांच्या हस्ते उपविजेत्या व विजेत्या संघांना पदके व चषक प्रदान करण्यात आले.