चेन्नई : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या शांत स्वभावाने, अचूक निर्णयक्षमतेने आणि नेतृत्वगुणांनी प्रतिस्पर्ध्यांना नमवणारा महेंद्रसिंग धोनी आता आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून दिसणार नाही. चेन्नई सुपर किंग्सने धोनीच्या नव्या भूमिकेची अधिकृत घोषणा करत त्याच्याकडे संघाच्या मार्गदर्शकाची (मेंटॉर) जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये जवळपास दोन दशकांपासून गाजत असलेल्या धोनी पर्वाचा खेळाडू म्हणून शेवट झाला असून, आता तो नव्या भूमिकेतून चेन्नईच्या यशाच्या प्रवासात योगदान देणार आहे.
‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. मैदानावर धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी आतुर असलेल्या चाहत्यांसाठी हा निर्णय भावनिक असला, तरी त्याची नव्या भूमिकेतील उपस्थिती संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे. चेन्नई आणि धोनी यांच्यातील नात्याचा हा नवा अध्याय असेल.
‘धोनीसारखा खेळाडू पुन्हा होणे शक्य नाही’
चेन्नई सुपर किंग्सने समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करत धोनीच्या योगदानाचा गौरव केला. धोनीसारखा खेळाडू पुन्हा होणे शक्य नाही. त्याची भूमिका बदलली असली तरी संघासोबतचे त्याचे नाते कायम राहणार आहे, असे फ्रँचायझीने म्हटले आहे.
असंख्य विजय, कठीण प्रसंग आणि अविस्मरणीय आठवणींच्या प्रवासात धोनी सुरुवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्सच्या केंद्रस्थानी राहिला आहे. संघाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यापासून ते आता नव्या पिढीतील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यापर्यंत त्याची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. ‘थाला’ हा चेन्नई सुपर किंग्सच्या ओळखीचा अविभाज्य भाग असेल आणि चेन्नई हेच त्याचे कायमचे घर राहील, अशा भावना फ्रँचायझीने व्यक्त केल्या.
फ्रँचायझीसाठी धोनीने मिळवलेल्या यशाबरोबरच एक माणूस म्हणून त्याचे व्यक्तिमत्त्वही महत्त्वाचे आहे. धोनी नेहमीच चेन्नई सुपर किंग्सची ओळख राहील आणि चेन्नई हेच त्याचे घर असेल, असे चेन्नई सुपर किंग्सचे मालक एन. श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले.
रांचीचा मुलगा बनला चेन्नईचा ‘थाला’
महेंद्रसिंग धोनीची क्रिकेटमधील कारकीर्द जितकी रंजक आहे, तितकीच चेन्नईशी जोडलेली त्याची कहाणीही खास आहे. रांचीमध्ये लहानाचा मोठा झालेला धोनी आपल्या आक्रमक फलंदाजी आणि शांत नेतृत्वामुळे दक्षिण भारतातील लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामासाठी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने त्याला १.५ दशलक्ष डॉलर मोजून आपल्या संघात दाखल केले.
त्यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी प्रमुख एन. श्रीनिवासन यांच्या मनात कर्णधारपदासाठी वीरेंद्र सेहवागचे नाव होते. मात्र, २००७ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकला होता. युवा खेळाडूंच्या संघाला एकत्र आणून त्याने मिळवलेले यश पाहता चेन्नईच्या नेतृत्वाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्याचा निर्णय झाला.
चेन्नईचे तत्कालीन प्रशिक्षक व्ही. बी. चंद्रशेखर यांनीही धोनीच्या नावाची शिफारस केली होती. धोनी कर्णधार म्हणून योग्य ठरेल आणि तोच संघाचा चेहरा बनू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे नाते अधिकाधिक घट्ट होत गेले.
चेन्नईच्या चाहत्यांनी धोनीला केवळ क्रिकेटपटू म्हणून नव्हे, तर आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे स्वीकारले. मूळचा रांचीचा असलेला धोनी चेन्नईकरांच्या प्रेमामुळे दक्षिण भारतातील लोकप्रिय चेहरा बनला. तामिळनाडूमध्ये चित्रपट अभिनेते आणि राजकीय नेत्यांना मिळणाऱ्या लोकप्रियतेच्या पंक्तीत एका क्रिकेटपटूनेही आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केली.
दोन वर्षांच्या बंदीनंतरही चाहत्यांचे प्रेम कायम
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे चेन्नई सुपर किंग्सवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. या काळात धोनीने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे प्रतिनिधित्व केले. बंदी संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने पुन्हा आयपीएलमध्ये पुनरागमन केले. त्यावेळी संघाला चाहत्यांचा पूर्वीसारखा पाठिंबा मिळेल का, अशी शंका व्यक्त होत होती. मात्र, चेन्नईकरांनी धोनीचे जल्लोषात स्वागत केले.
या स्वागताने धोनीही भावुक झाला होता. चाहत्यांचे प्रेम आणि विश्वास हेच आपल्यासाठी सर्वकाही असल्याचे सांगत त्याने संघाला पुन्हा विजेतेपद मिळवून देण्याचे आश्वासन दिले. २०२१ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आयपीएलचे विजेतेपद पटकावत हे आश्वासन पूर्ण केले.
धोनीचा नव्या भूमिकेत प्रवेश
वय आणि दुखापतींच्या पार्श्वभूमीवर धोनीने खेळाडू म्हणून आयपीएलमधून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचा क्रिकेटशी असलेला संबंध संपलेला नाही. मैदानावर फलंदाजी करताना दिसणारा धोनी आता डगआऊटमधून संघाला मार्गदर्शन करताना दिसेल. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ससाठी ‘थाला’चे पर्व संपलेले नसून त्याने केवळ नव्या भूमिकेत प्रवेश केला आहे.
पाच विजेतेपदांसह यशस्वी नेतृत्वाचा ठसा
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले. सातत्याने प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा संघ अशी चेन्नईची ओळख निर्माण करण्यात त्याचा मोठा वाटा होता. धोनीने आयपीएलमध्ये २२६ सामन्यांत कर्णधारपद भूषवले. त्यापैकी १३३ सामन्यांत त्याच्या संघाने विजय मिळवला. त्याचे विजयाचे प्रमाण ५८.८४ टक्के आहे. सर्वाधिक टी-२० सामन्यांत नेतृत्व करण्याचा मानही त्याच्या नावावर आहे.
‘थाला’ नावाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य
तामिळ भाषेत ‘थाला’ या शब्दाचा अर्थ नेता किंवा प्रमुख असा होतो. मैदानावर शांत राहून संघाचे नेतृत्व करणे, दबावाच्या क्षणी जबाबदारी स्वीकारणे आणि अखेरच्या षटकांत सामना जिंकून देणे, या गुणांमुळे धोनीला हे नाव मिळाले. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर त्याची एक झलक पाहण्यासाठी हजारो चाहते गर्दी करत असत.
धोनीची निवड सर्वोत्तम निर्णय : श्रीनिवासन
चेन्नई सुपर किंग्सचे मालक एन. श्रीनिवासन यांनीही धोनीच्या योगदानाचा गौरव केला. महेंद्रसिंग धोनीशिवाय चेन्नई सुपर किंग्सची कल्पनाच करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. जवळपास दोन दशकांच्या प्रवासात अनेक विजय, पराभव आणि कठीण प्रसंगांचा सामना केला. मात्र, एकमेकांच्या हेतूंवर कधीही शंका न घेतल्यामुळे आमच्यातील विश्वासाचे नाते अधिक घट्ट झाले. २००८ मध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्सचा भाग असलाच पाहिजे, असा आपला आग्रह होता. मागे वळून पाहताना तो आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय ठरल्याचे जाणवते, असे ते म्हणाले.


