टी-२० मालिकेतील यशानंतर भारताची नजर वनडे मालिकेवर

रोहित, कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष : दुखापतींमुळे न्यूझीलंडची चिंता वाढली

Story: गोवन वार्ता। न्यूज डेस्क |
03rd November, 11:55 pm
टी-२० मालिकेतील यशानंतर भारताची नजर वनडे मालिकेवर

ऑकलंड :
न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-२ अशी जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. टी-२० मालिकेतील यशाची पुनरावृत्ती वनडे मालिकेत करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. मात्र, मायदेशात खेळणारा न्यूझीलंडचा संघही पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरणार आहे. उभय संघांमधील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर होणार आहे.
या सामन्यात अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. दोघेही सध्या केवळ वनडे क्रिकेट खेळत असल्याने त्यांचा अनुभव भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. न्यूझीलंडचा हा त्यांचा अखेरचा दौरा ठरण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
रोहित-गिल सलामीला, कोहली तिसऱ्या क्रमांकावर
पहिल्या वनडेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे स्थान निश्चित मानले जात आहे. रोहितसोबत कर्णधार शुभमन गिल सलामीला उतरण्याची शक्यता आहे. विराट तिसऱ्या, तर उपकर्णधार श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.
यष्टीरक्षकाच्या निवडीचा पेच
यष्टीरक्षक फलंदाज म्हणून के.एल. राहुल आणि ईशान किशन यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागणार आहे. टी-२० मालिकेत ईशानने चांगली कामगिरी केली असली, तरी वनडेतील अनुभव आणि सातत्यामुळे राहुलला पसंती मिळण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार रेड्डी आणि अक्षर पटेल यांचे स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. टी-२० मालिकेत प्रभावी कामगिरी करणारा नमन धीर हाही पर्याय आहे. मात्र, पहिल्या वनडेत त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
सिराजला विश्रांती मिळण्याची शक्यता
गोलंदाजी विभागात कुलदीप यादव हा फिरकीचा प्रमुख पर्याय असेल. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला मात्र विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. नुकताच तो भारत ‘अ’ संघाकडून दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात खेळला होता. आगामी कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर त्याच्या कामाच्या ताणाचे व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
सिराजच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंगला संधी मिळण्याची शक्यता आहे. गुरनूर बरार आणि अंशुल कंबोज हेही वेगवान गोलंदाजीसाठी पर्याय असतील.
कॉनवे पहिल्या वनडेतून बाहेर; हेन्रीच्या फिटनेसवर लक्ष
दुसरीकडे, दुखापतींमुळे न्यूझीलंडच्या अडचणी वाढल्या आहेत. सरावादरम्यान झालेल्या धडकेत सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि वेगवान गोलंदाज मॅट हेन्री जखमी झाले. झेल घेण्याच्या प्रयत्नात दोघांची एकमेकांशी धडक झाली. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. कॉनवेला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेत खेळू शकणार नाही.
हेन्रीच्या प्रकृतीवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. दुखापतीमुळे तो भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेतील अखेरचे तीन सामने खेळू शकला नव्हता. वनडे मालिकेतील त्याच्या सहभागाबाबत अद्याप स्पष्टता नाही. न्यूझीलंड क्रिकेटने वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत पुढील माहिती देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
दुखापतींच्या संकटामुळे न्यूझीलंडच्या संघनिवडीसमोर आव्हान उभे राहिले असून, पहिल्या वनडेत भारतीय संघाला याचा फायदा घेता येतो का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.
रचिन रवींद्र, मार्क चॅपमनही मालिकेबाहेर
यापूर्वी न्यूझीलंडला रचिन रवींद्र आणि मार्क चॅपमन यांच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरता न आल्याने या दोघांनाही संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. हे दोघेही दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळू शकले नव्हते. त्यामुळे प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडला संघरचनेत बदल करावे लागणार आहेत.
ईडन पार्कवर भारताची कामगिरी संमिश्र
- ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर भारतीय संघाची वनडेतील कामगिरी फारशी समाधानकारक राहिलेली नाही. भारताने या मैदानावर आतापर्यंत एकूण ११ वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामन्यांत भारताला विजय मिळाला, तर सहा सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. एका सामन्याचा निकाल लागला नव्हता.
- भारताने या मैदानावर पहिला वनडे सामना १९७६ मध्ये सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली खेळला होता. त्या सामन्यात भारतीय संघाला ८० धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आगामी सामन्यात विजय मिळवून ईडन पार्कवरील आपली कामगिरी सुधारण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल.
२०२२ मधील सामन्यात न्यूझीलंडचा विजय
भारताने अखेरचा न्यूझीलंड दौरा २०२२ मध्ये केला होता. त्यावेळी तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेतील एक सामना ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर झाला होता. त्या सामन्यात भारताने शिखर धवन, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ३०६ धावा केल्या होत्या. मात्र, न्यूझीलंडने हे लक्ष्य सात गडी राखून सहज गाठले. यजमान संघाकडून टॉम लॅथमने नाबाद १४५ धावांची शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. यंदाच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला या पराभवाची पुनरावृत्ती टाळण्याचे आव्हान असेल.