पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप-मगो युती कायम राहणार असल्याचा विश्वास दोन्ही पक्षांचे नेते व्यक्त करीत असले तरी जागा वाटपावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील मतभेद उघड होऊ लागले आहेत. शिरोड्यात निवडणूक लढविण्याचा विचार मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी व्यक्त केल्यानंतर निवडणूक लढविल्यास दुसऱ्यांदा पराभव अटळ असल्याचे विधान मंत्री तसेच आमदार सुभाष शिरोडकर ( Water Resources Minister of Goa Subhash Shirodkar) यांनी केले आहे. यामुळे शिरोड्यात पुन्हा सुभाष शिरोडकर व दीपक ढवळीकर Pandurang alias Deepak Dhavlikar, President of the Maharashtrawadi Gomantak Party (MGP)) यांच्यात लढत होण्याची दाट शक्यता आहे.
असे झाल्यास मगो- भाजप युती तुटल्यात जमा आहे. वीजमंत्री तसेच मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी फोंडा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. दीपक ढवळीकर हे यापूर्वी दोन वेळा प्रियोळ मतदारसंघातून विजयी झाले आहेत. आता प्रियोळ मतदारसंघ एसटीसाठी राखीव होण्याची शक्यता आहे. आपण शिरोड्याहून निवडणूक लढविणार असल्याचे दीपक ढवळीकर यांनी पक्षाच्या आमसभेनंतर स्पष्ट केले होते. शिरोड्याचे भाजप आमदार व मंत्री सुभाष शिरोडकर यांनी त्यांना उघड आव्हान दिले आहे.
२०१९ साली दीपक ढवळीकर यांनी शिरोडा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांचा पराभव झाला होता. आता पुन्हा माझ्याविरूद्ध निवडणूक लढविल्यास त्यांचा पराभवच होईल, असे सुभाष शिरोडकर यांनी म्हटले आहे.
मगो व भाजप यांच्यामध्ये सध्या युती आहे. युती असतानाही उमेदवारीवर दावा करणे योग्य आहे का? असे विचारले असता याबाबत निर्णय घेणे पक्षाच्या नेत्यांवर अवलंबून आहे, असे ते म्हणाले.
सुभाष शिरोडकर हे भाजपचे आमदार असून शिरोडा मतदारसंघातून ते बऱ्याच वेळा निवडून आले आहेत. २०१९ची पोटनिवडणूक व २०२२ची निवडणूक ते भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाले आहेत. यापूर्वी बऱ्याच वेळा काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांनी विजय संपादन केलेला आहे.


