पणजी : राज्यात अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. फोंडा येथील कदंबा बसस्थानक (केटीसी) (KTCL) परिसरात छापा टाकून अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) (Anti-Narcotic Cell (ANC) Goa Police) निळ्या रंगाच्या बॅगेतील गांजा जप्त केला. या कारवाईत ७.१८७ किलो गांजा जप्त केला. त्याची बाजारातील किंमत सुमारे ७.१८ लाख रुपये आहे. याप्रकरणी दोघा बिहार येथील युवकांना अटक केली आहे.
३ नोव्हेंबर रोजी पहाटे १.२२ ते ४.५९ या वेळेत केटीसी बसस्थानकावरील सुलभ शौचालयाजवळ ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संकेत नाईक यांनी एएनसीच्या पथकासह दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला.
या प्रकरणी राहुल कुमार (२८ वर्षे, रा. एहीयापूर, अहियापूर, मुझफ्फरपूर) आणि अमित कुमार (३१ वर्षे रा. सागर सुलतानपूर, भगवानपूर हाट, सिवान) या बिहारमधील दोघांना अटक करण्यात आली आहे. छाप्यादरम्यान राहुल कुमार याच्या निळ्या रंगाच्या बॅगेत काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत लपवून ठेवलेला गांजा आढळून आला. पोलिसांनी पंचनाम्यानंतर गांजा जप्त केला.
याप्रकरणी एएनसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम २०(ब)(ii)(ब) आणि २९ अंतर्गत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अमली पदार्थांचा पुरवठा आणि तस्करीच्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक हरीशचंद्र मडकईकर, एएनसीचे प्रभारी उपअधीक्षक आशिष शिरोडकर आणि पोलीस निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 'नशामुक्त गोवा' उपक्रमांतर्गत अमली पदार्थ तस्करीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे एएनसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


