सत्तरीत वादळी वाऱ्याचा तडाखा; दहा ठिकाणी दुर्घटना

नगरगाव, ब्रह्माकरमळी, शेळप, नानेलीला फटका; घरांसह वीजवाहिन्यांचे नुकसान

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
02nd November, 11:59 pm
सत्तरीत वादळी वाऱ्याचा तडाखा; दहा ठिकाणी दुर्घटना

वाळपई : सत्तरी तालुक्याच्या विविध भागांना सोमवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा बसला. नगरगाव, ब्रह्माकरमळी, शिंगणे आणि ठाणे पंचायत क्षेत्रातील नानेली परिसरात झाडांची पडझड होऊन घरांचे, वीजवाहिन्यांचे तसेच रस्त्यांचे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. वाळपई अग्निशामक दलाच्या माहितीनुसार, एकूण दहा ठिकाणी दुर्घटना घडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील ब्रह्माकरमळी येथे सोमवारी सायं. ५.१५ च्या सुमारास जंगली झाड घरावर आणि वीजवाहिनीवर कोसळले. त्यानंतर सायं. ६.३० वा. याच परिसरात आणखी एक झाड वीजवाहिनीवर पडले. या घटनांमुळे वीजपुरवठा व्यवस्थेवर परिणाम झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
नगरगाव परिसरातील शेळप येथे फणसाचे मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. अग्निशामक दलाने झाड हटवून रस्ता मोकळा केला. नगरगाव येथेही रस्त्यावर पडलेले जंगली झाड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
ठाणे पंचायत क्षेत्रातील नानेली येथे प्रकाश गावकर यांच्या घराशेजारील मोठे आंब्याचे झाड घरावर कोसळले. त्यामुळे घराच्या बांधकामाचे नुकसान झाले. मात्र, घरातील कोणालाही दुखापत झाली नाही. वीजवाहिन्यांचे नुकसान आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने झाड हटवण्याचे काम पुढे ढकलण्यात आले.
दरम्यान, भुईपाल येथील धनगरवाडा परिसरात माडाच्या झाडाला आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या घटनेतही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही.
अग्निशामक दलाची तत्परता
या घटनांमध्ये वाळपई अग्निशामक दलाच्या विविध पथकांनी प्रतिकूल परिस्थितीत मदतकार्य केले. ब्रह्माकरमळी येथे संदीप गावकर, तर नगरगाव आणि शेळप येथे अरविंद देसाई यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी काम पाहिले. भुईपाल येथील आगीवर एस. एल. गावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नियंत्रण मिळवले. जवानांनी वेळेत केलेल्या कारवाईमुळे रस्त्यांवरील अडथळे दूर होऊन संभाव्य मोठे नुकसान टळले.
नऊ ठिकाणचे अडथळे दूर
वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळल्याची माहिती मिळताच वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यांवर पडलेली झाडे आणि फांद्या हटवून नऊ ठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यात आली. नानेली येथे घरावर पडलेले झाड वीजपुरवठा खंडित असल्यामुळे सोमवारी रात्री हटवता आले नाही. हे काम मंगळवारी सकाळी करण्यात येणार असल्याचे अग्निशामक दलाच्या सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा