पणजी :रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षक विकास देयकर आणि दुसऱ्या संशयित महिलेची सोमवारी जुने गोवा पोलिसांकडून पुन्हा चौकशी करण्यात आली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत गोवा राज्य बाल हक्क आयोगानेही पोलिसांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुरगाव तालुक्यातील पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, जुने गोवा पोलिसांनी शुक्रवार, ३० रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. निरीक्षक विकास देयकर याने २५ जुलै आणि २७ ऑक्टोबर रोजी लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. जुने गोवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक अंजली धुळपकर यांनी संशयित देयकर आणि संबंधित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पीडितेवर इस्पितळात उपचार
गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडितेची मेरशी येथील ‘अपना घर’मध्ये रवानगी करण्यात आली होती. मात्र, तिची प्रकृती बिघडल्यामुळे तिला सध्या बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
निलंबन आणि आयोगाची नोटीस
गुन्हा दाखल होताच पोलीस खात्याने निरीक्षक विकास देयकर याला निलंबित केले आहे. या घटनेची गोवा राज्य बाल हक्क आयोगाने स्वेच्छा दखल घेतली असून, पोलीस उपमहानिरीक्षकांना या गुन्ह्याशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
जुने गोवा पोलिसांनी शनिवार, ३१ रोजी संशयित निरीक्षक विकास देयकर आणि दुसऱ्या संशयित महिलेची प्राथमिक चौकशी केली होती. त्यानंतर सोमवारी या दोघांना पुन्हा बोलावून सलग दोन तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.


