एसटी आरक्षणावरील स्थगितीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

राज्य सरकारचा निर्णय : केंद्र, एसटी समाजाच्या स्वतंत्र याचिका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd November, 10:39 pm
एसटी आरक्षणावरील स्थगितीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

एसटी राजकीय आरक्षणासंदर्भात एसटी लोकसंख्येची अधिसूचना जारी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यावर दिल्लीतील बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. येत्या आठवड्यात गोवा सरकारसह केंद्र सरकार आणि एसटी समाज सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करणार आहेत.

गोवा सरकार सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (एसएलपी) दाखल करणार असून, केंद्र सरकार आणि एसटी समाजही स्वतंत्र याचिका दाखल करणार आहेत. तिन्ही पक्षांनी अशा प्रकारे स्वतंत्र याचिका दाखल कराव्यात, असा सल्ला देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिला आहे, असे शिष्टमंडळातील सदस्यांनी आणि एनआरआय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले.

दिल्लीतील बैठकीतील उपस्थिती

उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे आरक्षण प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडथळ्यावर कायदेशीर उपाय शोधण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पुढाकाराने दिल्लीत सॉलिसिटर जनरल यांच्यासोबत सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर, अॅड. नरेंद्र सावईकर, एसटी समाजाचे नेते अॅड. गोविंद शिरोडकर, अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अॅड. प्रवीण फळदेसाई उपस्थित होते.

एसटी समाजाची आव्हान याचिका

या प्रकरणाबाबत एसटी समाजाच्या वतीनेही सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती अॅड. गोविंद शिरोडकर यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम स्थगितीनंतर ‘उटा’नेही आक्रमक भूमिका घेतली असून, जनजागृती करण्यासाठी एसटी लोकसंख्या अधिक असलेल्या मतदारसंघांमध्ये त्यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. प्रियोळ, केपे, सांगे, काणकोण, नुवे, सावर्डे, कुडतरी, शिरोडा अशा २१ मतदारसंघांमध्ये एसटी समाजाची लोकसंख्या अधिक असून, या सर्व मतदारसंघांतील वाड्यावाड्यांवर बैठका घेण्यास सुरुवात झाली आहे.

चार मतदारसंघ आरक्षित
  1. राज्य निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अहवालानुसार नुवे, सांगे, केपे आणि प्रियोळ हे चार मतदारसंघ एसटी समाजासाठी आरक्षित होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
  2. सार्वजनिक सुनावणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मतदारसंघ आरक्षणाची अधिसूचना जारी होण्याची अपेक्षा होती.
  3. मात्र, लोकसंख्येची अधिसूचना जारी करण्यास स्थगिती मिळाल्याने आरक्षण प्रक्रियेला खीळ बसली आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी अन् पाठपुरावा

राज्यात मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना आणि केंद्रात वाजपेयी सरकार असताना गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाला एसटी दर्जा मिळाला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात २०२५ मध्ये एसटी आरक्षण विधेयक संमत झाल्याने ही प्रक्रिया पुढे गेली. राज्य सरकार निवडणूक आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा करत असून, अधिसूचना जारी करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा