पणजी : जुने गोवे ते गोवा वेल्हापर्यंत ऐतिहासिक वारसास्थळ (Old Goa to Goa Velha Historical heritage site) असलेल्या कदंबकालीन राजमार्गाला अतिक्रमणे व बांधकामामुळे धोका निर्माण झाला आहे. यावर कारवाई करून या ऐतिहासिक वारसास्थळाचे जतन करण्याची मागणी प्रा. रामराव वाघ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी तसेच अन्य संबंधित खात्यांकडे रीतसर तक्रार केली आहे.
हा मार्ग ओल्ड गोवा (जुने गोवे) आणि गोवा वेल्हा (गोपाकपट्टण) यांना जोडतो. या मार्गाची सध्या सुरू असलेली साफसफाई आणि सपाटीकरणाची कामे थांबवून, याला अधिकृतपणे 'संरक्षित वारसा स्थळ' म्हणून घोषित करण्याची गरज आहे. या ऐतिहासिक मार्गाचा बराचसा भाग आधीच डांबरीकरणाखाली आला आहे. ज्यामध्ये ओल्ड गोवा ते हेल्थवे हॉस्पिटल आणि शारदा मंदिर शाळा, तसेच भाटी ते पिलार-गोवा वेल्हा दरम्यानचा भाग समाविष्ट आहे.
गावली मौला आणि गान्सि-भाटी येथील घनदाट वनक्षेत्रातून जाणारा सुमारे दोन किलोमीटरचा भाग अजूनही पारंपरिक दगडी (रबल-स्टोन) मार्गाच्या स्वरूपात शिल्लक होता. यापूर्वी, डांबरीकरणाच्या तयारीसाठी हा भाग दगड आणि मातीने झाकून सपाट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, तो हस्तक्षेपानंतर थांबवण्यात आला होता.
मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांत शिल्लक राहिलेल्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर साफसफाई आणि सपाटीकरणाचे काम करण्यात आले आहे. यामध्ये मध्यम आकाराची झाडे उपटून टाकणे, झुडपे तोडणे आणि मजूर तसेच जेसीबी यंत्रांचा वापर करून मूळ मार्गाची रचना विस्कळीत करणे, अशा गोष्टी घडल्या आहेत. या कृतींमुळे केवळ ऐतिहासिक वारशाचे अवशेषच नव्हे, तर ज्या वनक्षेत्रातून हा मार्ग जातो, तो तुलनेने अबाधित असलेला नैसर्गिक परिसरही धोक्यात आला आहे. 'राजबिद' हा गोव्याच्या पोर्तुगीज-पूर्व वारशाचा एक दस्तऐवजीकरण केलेला भाग आहे.
गोवा पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या 'गोपुरी अँड गोवा वेल्हा: अ टेल ऑफ टू सिटीज—वॉकिंग द लॅबिरिंथ्स ऑफ हिस्ट्री' या प्रकाशनात, गोपाकपट्टण या जुन्या बंदरापासून पिलार, भाटी , गावशी आणि गावळी -मौला मार्गे ओल्ड गोवापर्यंत जाणाऱ्या 'राजवीथी' मार्गाचे वर्णन केले आहे. यात या मार्गावर झालेले काही प्रमाणात डांबरीकरण आणि अतिक्रमणांचीही नोंद आहे. हा मार्ग कदंब राजा जयकेशी (प्रथम) याच्या काळातील असल्याचे नमूद केले आहे. गोपाकपट्टणला 'एला'शी जोडण्यात या मार्गाची भूमिका स्पष्ट केली आहे.
तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धन करा
पात्र तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धन करून, शिल्लक राहिलेला राजबिड त्याच्या मूळ रचनेत आणि दगडी फरसबंदीच्या स्वरूपातच टिकवून ठेवावा. त्यावर डांबर किंवा काँक्रीट टाकल्यास, त्याला ऐतिहासिक मूल्य देणारी वैशिष्ट्येच झाकली जातील किंवा त्यांना नुकसान पोचेल. त्यामुळे, मूळ रस्ता आणि त्याच्या सभोवतालचे वनक्षेत्र यांचे एकत्रितपणे संवर्धन केले पाहिजे.
पर्यटकांसाठीचा कोणताही प्रवेश मर्यादित आणि संवर्धनाशी सुसंगत असावा, शक्यतो पायी चालण्याच्या पायवाटेद्वारे, आणि रस्त्याचे रुंदीकरण, मोठ्या प्रमाणावर फरसबंदी किंवा अशा पायाभूत सुविधा नसाव्यात ज्यामुळे त्या परिसरात पुढील विकासाला वाव मिळेल.
शिल्लक राहिलेल्या राजबिडला संरक्षित स्मारक किंवा संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी, गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे व अवशेष अधिनियम, १९७८च्या कलम ३ अंतर्गत कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी प्रा. रामराव वाघ यांनी केली आहे.
जमिनीसह रस्त्याची तपासणी करण्याची मागणी
रस्त्याची अखंडता आणि स्थान जपण्यासाठी आवश्यक असलेल्या लगतच्या जमिनीसह रस्त्याची तपासणी करावी. तपासणी पूर्ण होईपर्यंत, लागू असलेल्या कायदेशीर अधिकारांचा वापर करून पुढील साफसफाई, सपाटीकरण, कचरा टाकणे, रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण आणि दगड काढण्याचे काम तात्काळ थांबवावे. पुरातत्व, महसूल, टीसीपी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आणि संबंधित ग्रामपंचायत, तसेच स्थानिक प्रतिनिधी आणि वारसा तज्ञांचा समावेश असलेली तातडीची संयुक्त तपासणी करावी.
शिल्लक असलेल्या मार्गाचे सर्वेक्षण करून नकाशा तयार करावा, बाधित सर्वेक्षण क्रमांक आणि मालकीची नोंद करावी, आणि झालेल्या नुकसानीचे दस्तऐवजीकरण करावे. शिल्लक राहिलेला रस्ता आणि त्याच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेली जमीन, यांचा समावेश असलेल्या स्पष्ट नकाशांकित सीमांसह, कलम ३ ची अधिसूचना प्रक्रिया विनाविलंब सूरू करा, अशी मागणी केली आहे.


