मंगळुरू : कर्नाटकातील मंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या जागतिक कोकणी संगीत अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी उपस्थिती लावली. ‘मांड सोभाण’ संस्थेच्या ४० वर्षांच्या वाटचालीचा आणि कोकणी भाषेच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उत्सव या अधिवेशनाच्या माध्यमातून साजरा करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या कार्यक्रमात १२ दिवसांच्या गायनातून गिनीज विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. (𝐅𝐢𝐫𝐬𝐭 𝐖𝐨𝐫𝐥𝐝 𝐊𝐨𝐧𝐤𝐚𝐧𝐢 𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐌𝐞𝐠𝐚 𝐂𝐨𝐧𝐯𝐞𝐧𝐭𝐢𝐨𝐧 at Mangaluru, Karnataka).
या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘मांड सोभाण’ संस्थेचे अध्यक्ष लुईस जे. पिंटो, डॉ. रोनाल्ड कुलासो आणि आयोजन समितीचे अभिनंदन केले. गोवा आणि कर्नाटक यांच्यात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नाते असून, कोकणी भाषा या दोन्ही राज्यांतील विविध समाजघटक, परंपरा आणि पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या अधिवेशनात गोव्यातील ५३ पथकांसह एकूण ३०० पथके सहभागी झाली आहेत. या उपक्रमात ६,७८९ हून अधिक गायक सहभागी होणार आहेत. ४,५०० हून अधिक कोकणी गीतांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सलग १२ दिवस, १२ तास आणि १२ मिनिटे चालणाऱ्या या गायन महोत्सवातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
‘एक भाषा, अनेक स्वर आणि एकच सामायिक सांस्कृतिक वारसा’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव कोकणी भाषेच्या जागतिक ओळखीला नवी उंची देणारा ठरणार अशी अपेक्षा असल्याचे आयोजकांनी सांगितले.


